संदीप खवळे- कोल्हापूर --‘हिरवाई’चा नारा देत मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेली ‘शतकोटी वृक्षलागवड योजना’ या वर्षी शत-प्रतिशत गुंडाळण्यात आल्याचे चित्र आहे. या योजनेसाठीचे उद्दिष्ट जुलै संपत आला, तरी कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आलेले नाही. या योजनेतून मे २०१४ अखेर जिल्ह्यात विविध खात्यांकडून ५८ लाख रोपटी लावण्यात आली होती. महसूल व वनखात्यातर्फे सन २०११ मध्ये पाच वर्षांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतून ग्रामपंचायत, वनविभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, पालिका, आदी विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात येते. कोल्हापूर वनविभागाच्या माहितीनुसार या योजनेंतर्गत मे २०१४ अखेर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे ३४.११ लाख, कोल्हापूर वनविभागातर्फे ११.३८ लाख, तर सामाजिक वनीकरण खात्याकडून २.८०, कृषी विभागातर्फे ९.४१ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. तसेच पालिकांसह अन्य खात्यांकडून १.५७ लाख रोपांची लागवड केली होती. गतवर्षी वनविभाग आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला ३५.३८ लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते; पण या वर्षी जुलै संपत आला, तरीही महसूल आणि वनविभागातर्फे या वर्षीचे उद्दिष्ट या यंत्रणांना आलेले नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील रोप लागवडीची संख्या अठ्ठावन्न लाखांहून दहा लाखांवर आली आहे. ही रोप लागवडही ‘शतकोटी’शिवाय अन्य योजनांमधून झाली आहे. त्यामुळे शतकोटी वृक्षलागवड योजना पाच वर्षांच्या आतच शत-प्रतिशत बंद झाल्याचे चित्र आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत मे २०१४ अखेर जिल्ह्यात वनविभागासह अन्य विभागांतर्फे सन २०१४-१५ मध्ये ५८ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. या वर्षी योजनेंतर्गत या वर्षीचे उद्दिष्ट आलेले नाही. वनविभागाच्या विविध योजनेंतर्गत या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात सात लाख तेरा हजार रोपांची लावगड करण्यात आली आहे.- रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक, कोल्हापूर
वृक्षलागवडीला यंदा शत-प्रतिशत खो
By admin | Updated: July 17, 2015 00:07 IST