अनिल पाटील ल्ल मुरगूडमुरगूड, कागल नगरपालिका निवडणुकीनंतर आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मंडलिक आणि दोन घाटगे गट एकत्र येणार, असे वातावरण तयार झाले होते; पण गेल्या चार दिवसांमध्ये संजय मंडलिक आणि समरजित घाटगे यांच्यातील जाहीर वक्तव्यांवरून महायुतीचं घोडं जागावाटपावरून अडणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमध्ये तिरंगी लढती होणार, अशी स्थिती सध्यातरी आहे. या तिरंगी लढतीचा फायदा मात्र नेमक्या कोणत्या गटाला होणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.पालिका निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. अर्थात हा कार्यक्रम लागण्याअगोदर सर्वच गटांनी कार्यक्रमांचा धडाका लावला होता. यामध्ये बऱ्याच कार्यक्रमांमध्ये या ना त्या कारणाने संजय मंडलिक, समरजित घाटगे व संजय घाटगे एकत्र आल्याचे दिसले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या तिघांची युती अंतिम मानली गेली होती. अर्थातच या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आमदार हसन मुश्रीफ यांनीही आपला जनसंपर्क सुरू ठेवला होता.मुरगूड व कागल नगरपालिका निवडणुकीत आघाडी होण्यासाठी शेवटपर्यंत चर्चा सुरू ठेवली आणि शेवटी घाईगडबडीत समरजित घाटगे यांना दोन्ही ठिकाणी भाजपच्या चिन्हावर स्वतंत्र लढावे लागले. हा अनुभव लक्षात घेता त्यांनी आघाडीबाबत लवकर चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगून चर्चेसाठी पुढाकार घेतला; पण त्यांच्या मते दोन्ही संजयनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे निढोरी येथील मेळाव्यात चांगला तोडगा निघाला तर शक्य; अन्यथा भाजपही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे समरजित यांनी सांगितले होते.‘शाहू’च्या बॅनरखाली आयोजित सर्वच मेळाव्यांना तोबा गर्दी झाली. त्यामुळे समरजित यांचा विश्वास नक्कीच दुणावला होता. साहजिकच आपल्या गटासाठी जास्त जागा मागणे हे क्रमप्राप्त होते. परंतु, त्यांच्या या भूमिकेला अहंपणा समजून संजय मंडलिक यांनी तर मुरगुडातील सेनेच्या चैतन्य मेळाव्यात विकासाच्या मुद्यावर आपल्याबरोबर येत असेल तर येऊ देत, असे सांगून अहंपणा कोण दाखवित असेल तर बाबा आपल्या आघाडीत कोणाला घ्यायचे नाही, असे सांगून चर्चेची दारे बंद केली आणि त्यामुळे बाचणीमध्ये समरजित यांनी कार्यकर्त्यांना स्वबळासाठी तयार राहा, असा इशाराच दिला.अर्थात संजय मंडलिक यांना लोकसभेची जोडणी लावावयाची आहे, तर संजय घाटगे यांना पंचायत समितीवरील आपली सत्ता सोडावयाची नसून, विधानसभेसाठीही तयारी करायची आहे. त्यामुळे या तीन नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा होऊन आपल्या राजकीय सोयीसाठी महायुती आकाराला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार हसन मुश्रीफ मात्र या युतीच्या खेळाकडे अगदी मिश्कीलपणे पाहत आपली राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा अनुभव लक्षता घेता त्यांच्या ऐनवेळच्या एखाद्या निर्णयाने तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. सद्य:स्थितीत मंडलिक, संजय घाटगे गट आपली सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर मुश्रीफ गट सत्ता मिळवण्यासाठी व्यूहरचना करताना दिसत आहे. परंतु, समरजित घाटगे मात्र प्रत्येक गावागावांत जाऊन भाजपच्या माध्यमातून आपल्या गटाला ऊर्जितावस्थेमध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
कागलच्या महायुतीस जागावाटपावरून ‘खो’
By admin | Updated: January 17, 2017 00:21 IST