कोल्हापूर : बारावीच्या गुणपत्रिका हातात पडल्या आहेत, तर दहावीच्या निकालाला अवघे काही दिवस शिल्लक असून, अशावेळी विद्यार्थ्यांच्या मनात करिअरचे कोणते क्षेत्र निवडायचे याबाबतचे विविध प्रश्न आहेत. या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी कोल्हापुरात आज, बुधवारपासून ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ला प्रारंभ झाला. प्रत्यक्ष संवाद साधून विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन होत असल्याने पहिल्याच दिवशी या शैक्षणिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.राजारामपुरातील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनातील हे प्रदर्शन १३ जूनपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. प्रदर्शनात विविध मान्यवर शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या असून, स्टॉलवर अभ्यासक्रमांची माहिती दिली जात आहे. निव्वळ अभ्यासक्रमांची माहिती देणारी पत्रके वाटण्याऐवजी याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी प्रत्यक्ष संवाद स्टॉलवरील व्यक्तींकडून साधला जात आहे. आपल्या पाल्याला कोणत्या क्षेत्रात रस आहे, तो कोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधून पालकांना स्टॉलवरच मार्गदर्शन केले जात आहे. प्रत्येक स्टॉल विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलला होता. कोल्हापूर शहरासह कागल, दानोळी, शिरोळ, इचलकरंजी, सांगली, आदी परिसरातून विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.आज सकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन होण्यापूर्वीच विद्यार्थी, पालकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. या प्रदर्शनांतर्गत दिवसभरात झालेल्या व्याख्यानांना विद्यार्थी, विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. सेमिनार हॉल खचाखच भरला होता. रात्री प्रदर्शनाची वेळ संपेपर्यंत गर्दी कायम होती. विज्ञान, वाणिज्य आणि कला या पारंपरिक शाखांपेक्षा वेगळे करिअर करण्याकडे सध्या विद्यार्थ्यांचा कल आहे. ते लक्षात घेऊन या प्रदर्शनात व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या शिक्षणसंस्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, माहिती व तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, व्यवस्थापन अशा विविध शैक्षणिक अभ्यासक्रम, त्यातील संधी काय आहेत, याची माहिती स्टॉलवर दिली जात आहे. (प्रतिनिधी) दर तासाच्या बक्षिसांचे मानकरीया प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी दर तासाला एक लकी ड्रॉ काढण्यात आला. यात दीपक लोखंडे (म्हाडा कॉलनी), परिमल पाटील (मोहिते कॉलनी), सुशांत कवडे (शुक्रवारपेठ), गीता उन्हावे (शिरोली पुलाची), डॉ. तेजस्विनी मुडेकर (कदमवाडी), सचिन मणियार (शाहूपुरी), मोसीना मोमीन (शाहूपुरी), हिंदुराव देवाळकर (कोपार्डे) हे बक्षिसाचे मानकरी ठरले.दोनशे विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकेया प्रदर्शनाला उद्या, गुरुवारी सर्वप्रथम भेट देणाऱ्या पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना ‘लोकमत’तर्फे जनरल नॉलेजची पुस्तके दिली जाणार आहेत.
‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू
By admin | Updated: June 12, 2014 01:04 IST