लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी दूध विक्रीला फटका बसला. जिल्ह्यात ४० हजार लिटरने विक्री कमी झाली असून, मुंबई, पुण्यातील विक्रीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ व ‘वारणा’ दूध संघांची सुमारे दीड लाख लिटर दूध विक्री घटली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून कडक लाॅकडाऊन सुरू झाले आहे. लॉकडाऊनमधून दूध व मेडिकल यांना वगळण्यात आले आहे. दूध संकलन सुरळीत असले तरी विक्रीवर परिणाम झाला आहे. हॉटेल, चहाच्या टपऱ्या, कार्यालये, औद्योगिक वसाहती बंद असल्याने दुधाची मागणी कमी झाली आहे. कोल्हापूरसह कोकणात ‘गोकुळ’ची रोज दीड लाख लिटर दुधाची विक्री होते. त्याचरोबर पुण्यात अडीच लाख, तर मुंबईत आठ लाख लिटर दूध विक्री होते. येथेही दुधाची विक्री कमी झाली आहे. ‘वारणा’ दूध संघाची विक्री कमी झाली असून, उपपदार्थांच्या विक्रीलाही फटका बसला आहे.
आज, आणखी दूध विक्री घटणार
आज, सोमवारपासून आणखी दूध विक्रीमध्ये घट होईल, असा दूध विक्रेत्यांचा अंदाज आहे. दुधाची मागणी कमी होत असल्याने त्यानुसारच विक्रेते दूध संघांकडे बुकिंग करीत आहेत.
कोट-
‘वारणा’ दूध संघाचे दूध संकलन सुरळीत राहिले. मात्र, दूध व उपपदार्थ विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे.
- मोहन येडूरकर (कार्यकारी संचालक, ‘वारणा’ दूध संघ)