हरी बुवा शिये
शिये (ता. करवीर ) : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनाप्रणीत जय भवानी विकास आघाडी व विरोधी जय श्री हनुमान ग्रामविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत होत असली तरी अपक्षांनी या दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान उभे केल्याने शिये ग्रामपंचायतीची निवडणुकीत रंगत आली आहे. सत्ताधारी शिवसेनेला शह देण्यासाठी स्थानिक गट एकत्रित येऊन मोर्चेबांधणी करत आहेत. पण अपक्ष उमेदवार दोन्ही आघाड्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, तर विरोधी आघाडीचे नेतृत्व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्जेराव काशीद, पांडुरंग पाटील, विलास जाधव, जयसिंग काशीद व शिवाजी बुवा यांच्याकडे आहे.
प्रभाग क्रमांक एकमध्ये सत्ताधारी आघाडीकडून माजी सरपंच विश्वास पाटील, माजी उपसरपंच वंदना चव्हाण व लहू बुवा यांच्या विरोधात विरोधी आघाडीकडून माजी उपसरपंच जयसिंग पाटील, रेखा जाधव व विलास गुरव यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. याशिवाय पालकमंत्री सतेज पाटील समर्थक विकास चौगले याच प्रभागातून अपक्ष म्हणून पुन्हा निवडणूक लढवत असल्याने ही निवडणूक लक्ष्यवेधी बनली आहे. शेतकरी संघटनेने याच प्रभागात तीन उमेदवार उभे केल्याने या प्रभागात उमेदवारांची गर्दी झाली आहे. प्रभाग दोनमधून सत्ताधारी आघाडीकडून कृष्णात चौगले, राणी बुवा, सुप्रिया मोरे यांच्या विरोधात कृष्णात चौगले, सुनीता रानगे, पूनम सातपुते हे निवडणूक लढवत आहेत. या प्रभागाची रचना बदलल्यामुळे प्रभाग तीनमधील नव्याने समाविष्ट झालेले मतदान निर्णायक ठरणार आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये यावेळी दोन जागा आहेत. स्टोन क्रशर असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष मोहन पाटील, माजी उपसरपंच यशवंत पाटील यांच्या गटाची व शिवसेनेची ताकद या प्रभागात एकत्र आहे, तर विरोधी आघाडीच्या नेतृत्वाला माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद यांच्या गटाची ताकद मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक चारमध्ये २०१४च्या निवडणुकीत तिन्ही आघाडींना प्रत्येकी एक जागा मिळाली होती. येथे सत्ताधारी आघाडीच्या महेश शिंदे, लता शिंदे व संदीप बुवा यांच्या विरोधात योगेश पाटील, शीतल मगदुम व हंबीरराव कोळी यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. अपक्ष उमेदवार दत्ता शिंदे यांची उमेदवारी दोन्ही आघाडीची डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक पाच हा विद्यमान सरपंच रणजित कदम यांचा प्रभाग. त्यांच्या वहिनी शीतल कदम या रिंगणात उतरल्या आहेत. सर्वच प्रभागात तगडे उमेदवार रिंगणात उतरल्याने शिये ग्रामपंचायतीत चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे.