भोगावती : जिल्ह्याचे नेते पी. एन. पाटील आणि प्रा. ए. डी. चौगले यांनी भोगावती शिक्षण मंडळाची घटना, कायदा व लोकशाही पद्धत पायदळी तुडवून संस्था हडप केली आहे; तर कॉँग्रेसच्या काळात १०० कोटींच्या कर्जाबरोबर ५६ कोटींचा तोटा, थकीत ऊस बिल, कामगारांचा पगार, सभासदांची साखर यांचा कॉँग्रेसवाल्यांबरोबर उदयसिंह पाटील-कौलवकर, सदाशिवराव चरापले यांना सोईस्कर विसर पडला आहे, असा प्रतिहल्ला ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, उपाध्यक्ष हंबीरराव पाटील आणि संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत केला.कारखान्याच्या सन २०११-१२, २०१२-१३ वेळच्या लेखापरीक्षण अहवालातील दोषदुरुस्ती अहवाल शासनाला वेळोवेळी पाठविला आहे. त्याबाबत शासनाच्या कोणत्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. याचा फायदा घेत बंडोपंत वाडकर, सदाशिव चरापले, उदयसिंह पाटील यांनी प्रादेशिक सहसंचालक व साखर आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. कारखान्याच्या कामकाजाची चौकशी लागावी म्हणून हायकोर्टात दाद मागितली. यातून काही निष्पन्न होत नाही म्हणून राजकीय दबाव आणून सहसंचालक यांच्यामार्फत ८३ अन्वये चौकशीस मंत्र्यांना भाग पाडल्याचा आरोप पाटील यांनी केला. चरापले अध्यक्ष असताना सोनतळी येथे कारखान्याच्या मालकीची कोट्यवधी किमतीची आठ एकर जमीन फक्त ११ लाखांना विकली. हा गोलमाल स्पष्ट करावा; तसेच कारखान्यात २७ लाखांचे डस्ट कॅचर मशीन जोडले तेव्हापासून १७ कोटी खर्चून चरापले यांंच्या काळात आधुनिकीकरण झाले. त्यावर ३ हजार ५०० मेट्रिक टन गाळप केले जात होते आणि त्याच मिलवर ४५०० ते ५१९० मेट्रिक टनांनी गाळप करीत आहोत. कॉँग्रेसच्या कार्यकाळात संचालक साखर विक्री कमिशनच्या ‘ढपल्या’चा धंदा जोमाने करीत होते, असा आरोप त्यांनी केला. आम्ही ४०० रुपये जादा दराने साखर विक्री केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत माजी उपाध्यक्ष रघुनाथ जाधव, अशोकराव पाटील, नामदेव पाटील, केरबा पाटील, नंदकुमार पाटील, प्रा. किसन चौगले, वसंतराव पाटील, राजू कवडे, शंकर पाटील, संजय डकरे, संभाजीराव पाटील, पांडुरंग डोंगळे, आदींसह संचालक उपस्थित होते.(प्रतिनिधी)
काँग्रेसच्या काळातच कर्ज आणि तोटा
By admin | Updated: August 31, 2014 00:28 IST