मलकापूर : शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचे दिलेले आश्वासन सरकारकडून कधी पूर्ण होणार आहे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना बोलते करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी साळशी (ता. शाहूवाडी) येथील शिवार संवाद यात्रा कार्यक्रमादरम्यान मंत्री चंद्रकांतदादांचा थोडावेळ शाब्दिक वाद रंगला. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना पालकमंत्री तथा महसूलमंत्री समाधानकारक उत्तर न देता बगल देत असल्याच्या समजातून स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमातून बाहेर पडले. शिवार संवाद यात्रेनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे शाहूवाडीतील काही गावांच्या भेटीवर असताना शुक्रवारी (ता. २६) दुपारी साळशी गावातील कार्यक्रमात हा प्रकार घडला. दरम्यान साळशी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मंत्री चंद्रकांतदादा पुढील कार्यक्रमासाठी निघाले असताना कार्यक्रम स्थळाबाहेर थांबलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कृषीपंपाला चोवीस तास वीज पुरवठा झालाच पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात, घोटाळेबाज साखर कारखानदारांची पाठराखण थांबवून दिलेल्या आश्वासनांप्रमाणे त्यांची तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी करा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शाहूवाडीचे पो. नि. अनिल गाडे यांनी सुरेश म्हाऊटकर (बांबवडे) व अमरसिंह पाटील (साळशी) या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. संघटनेचे तालुका अध्यक्ष जयसिंग पाटील, पद्मसिंह पाटील, शिवाजी पाटील, तुकाराम खुटाळे, अजित पाटील, अवधूत जानकर, अनिल पाटील या शिवार संवाद यात्रेवेळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची सनदशीर मागार्ने उकल होईल म्हणून आम्ही उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना पालकमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना आमचा आवाज दाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबाब नोंदवून घेतल्यानंतर सोडून दिले.
शिवार संवाद यात्रेदरम्यान मंत्र्यांशी शाब्दिक वाद
By admin | Updated: May 26, 2017 18:51 IST