कोपार्डे : कोपार्डे व कुडित्रे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना येण्या- जाण्यासाठी एसटीच्या फेऱ्या वेळेत नसल्याने आपला जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत आहे. सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळेत एसटी बस उपलब्ध होत नसल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणाऱ्या करवीर पन्हाळा गगनबावडा व शाहूवाडी या चार तालुक्यांतील मुले- मुली कोपार्डे येथे असलेल्या स.ब. खाडे महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व कुंभी कासारी कारखान्यावर असलेल्या श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, डी.सी. नरके ज्युनिअर कॉलेज तसेच अनेक संगणक प्रशिक्षण देणाऱ्या क्लासेससाठी मोठ्या संख्येने येत असतात. दर्जेदार शिक्षण व ग्रामीण वातावरण यामुळे विशेषतः मुलींचे पालक आपल्या मुली येथे शिक्षणासाठी पाठवत आहेत.
लाॅकडाऊन समाप्त झाल्याने शाळा, महाविद्यालयांचे कामकाज पूर्वपदावर आले आहे. यामुळे दररोज एक ते दीड हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत आहेत.
ग्रामीण भागातून येणाऱ्या या मुला- मुलींना वेळेत महाविद्यालय व शाळेत पोहोचण्यासाठी व सुटल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी एसटी बसच्या वेळापत्रकाचे नियोजन नसल्याचे चित्र आहे. मुला-मुलींना सुटी झाल्यानंतर कोपार्डे येथील सांगरूळ फाट्यावर एसटी बसला यावे लागते. एखादी एसटी बस कोल्हापूरहून येताना दिसताच ती पकडण्यासाठी मुले-मुली जीव धोक्यात घालून एकच धाव घेतात. यामुळे विशेषतः मुलींना मोठा त्रास होत असून या मार्गावर एसटी बसच्या फेऱ्या सोडताना शाळा, महाविद्यालयांच्या वेळापत्रकाचा अभ्यास करावा, अशी मागणी होत आहे.
चौकट
१) शाळा सुटताना एसटीची फेरी असावी
ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी सकाळी पाच वाजल्यापासून शाळेच्या वाटेवर असतात. सुटल्यानंतर एसटी वेळेत मिळाली नाही तर घरात पोहोचण्यासाठी दुपारी दोन- तीन वाजतात. यासाठी येथे असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्याने गर्दी कोणत्या वेळेत होते याचा अहवाल द्यावा व शाळा सुटणाऱ्या वेळेत एसटी फेऱ्यांचे नियोजन करावे.
२) शिक्षक आमदारांनी लक्ष घालावे
सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयंत आसगावकर हे शिक्षक आमदार झाले आहेत. त्यांच्या संस्थेत शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या ८० टक्के आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची एसटीसाठी होणारी परवड थांबवण्यासाठी आ. प्रा. आसगावकर यांनी व्यक्तिगत लक्ष घालावे, अशी पालक, विद्यार्थ्यांची मागणी आहे.
(फोटो) कोपार्डे, ता. करवीर येथे सांगरूळ फाट्यावर महाविद्यालय व शाळकरी मुलींची एसटी बस पकडण्यासाठी जीवघेणी धावपळ.