कोल्हापूर : प्रेमसंबंधास अडथळा ठरणाऱ्या पहिल्या प्रियकाराचा खून करून त्याचा काटा काढल्याप्रकरणी न्यायालयाने संतोष पुंडलिक कापसे (वय २४ रा. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले) व दमयंती राजू यादव (वय ३०, रा. इंदिरानगर, इचलकरंजी) यांना दोषी ठरवून जन्मठेपेची तसेच सात वर्षे कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी शिक्षा सुनावली. सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले. जून २०१४ मध्ये वाठार येथे सुशांत मोरे याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. वडगाव पोलिसात हा गुन्हा नोंद आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दमयंती यादव ह्या मृत सुशांत मोरे यांचे वडील दत्ता मोरे यांच्याकडे कामास होती. तेव्हा तिचे सुशांतसोबत प्रेम जुळले. दरम्यान, तेथील संतोष कापसे याने सातारा येथे हॉटेल व्यवसाय सुरू केला. तेथे दमयंती कामास गेल्या. यावेळी संतोष आणि दमयंती यांच्या प्रेमसंबंध जुळले. हे सुशांतला समजले. त्यातून वाद होत होते. दि. २५ जून २०४ ला सुशांत हा कापसे राहात असलेल्या ठिकाणी आला. तेथे संतोष व दमयंती यानी प्रेमात अडथळा ठरणाऱ्या सुशांतला बॅटने मारून खून केला. मृतदेह किचन कट्ट्याखाली लपवला. गुन्ह्यात सापडण्याच्या भितीने दोघांनी सुशांतचा मृतदेह पोत्यात बांधून त्याच्याच दुचाकीवरून निलेवाडी ते ऐतवडे रस्त्यावरील उसाच्या शेतात टाकला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर ॲड. महाडेश्वर, ॲड. एस.एम.पाटील यांनी काम पाहिले. सतरा साक्षीदार तपासले. युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी आरोपींना दोषी ठरविले. गुरुवारी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्यात ॲड. झेबा पठाण, ॲड. गजानन कोरे, सहायक फौजदार एम.एम.नाईक, पैरवी अधिकारी मिलिंद टेळी यांचे सहकार्य लाभले. तपास वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पो. नि. संजीव पाटील, उपनिरीक्षक गणेश वारोळे यांनी केला.
फोटो नं. २५०३२०२१-कोल-संतोष कापसे (आरोपी)
फोटो नं. २५०३२०२१-कोल-दमयंती यादव (आरोपी)