कोल्हापूर : पक्ष्यांचे स्थलांतर, त्यांचे जीवनमान याची सविस्तर माहिती बालचमूबरोबर कोल्हापूरकरांनी ही घेतली... निमित्त होतं ! येथील कोष्टी समाज युवा संघटनेचा २३ वा वर्धापनदिन आणि लोकमत युवा नेक्स्ट आयोजित ‘बर्ड मायग्रेशन’ या लघुपटाचे. यावेळी निसर्गमित्र बंडा पेडणेकर यांनी ‘चला अनुभवूया पक्ष्यांचे जग’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी समाजाचे अध्यक्ष महादेवराव इदाते, उपाध्यक्ष पांडुरंग कवडे, सुरेश कवडे उपस्थित होते. मंगळवार पेठेतील श्री चौंडेश्वरी मंदिर, सांस्कृतिक हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.पेडणेकर म्हणाले, पक्ष्यांचे स्थलांतर हे ऋतुमानानुसार होते. उत्तर भारतात थंडी असेल, तेव्हा सर्व पक्षी दक्षिणेत येतात. भारतात पक्ष्यांच्या साडेचारशे जाती आहेत. पर्वत, नद्या, इमारती हे संकेतस्थळ लक्षात ठेवून ते प्रवास करतात. त्याचबरोबर विरळ हवेतसुद्धा जीवन जगतात. पूर्वी जुन्या छप्परांच्या घरात पोकळीमध्ये चिमण्या राहत होत्या. पण, आता छप्पराची घरेच दुर्मीळ झाल्याने शहरातील त्यांचे वास्तव्य कमी झाले आहे. पक्ष्यांना मानवापासून सर्वाधिक धोका असतो. वाढत्या प्रदूषणांमुळे ते मृत्युमुखी पडतात. त्याचबरोबर वेगात फिरणाऱ्या पवनचक्क्यांच्या पात्यांना धडकूनही त्यांचा मृत्यू होतो. यावेळी ‘बर्ड मायग्रेशन’हा लघुपट दाखविला. स्वागत व प्रास्ताविक महेश ढवळे यांनी, तर शशांक मकोटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी राजू ढवळे, देवेंद्र कवडे, विशाल मकोटे यांनी विशेष सहकार्य केले. राहुल खार्गे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कोल्हापूरकरांनी अनुभवले पक्ष्यांचे जीवन
By admin | Updated: January 20, 2015 00:53 IST