राजाराम लोंढे - कोल्हापूर विरोधकांना गेल्या सहा वर्षांत चांगले कधी दिसलेच नाही. ऊठसूट बॅँकेच्या कारभाराबाबत तक्रारी करून त्यांनी बॅँकेची बदनामी केली. रिझर्व्ह बॅँकेच्या परवानगीशिवाय लाभांश का वाटला म्हणून तक्रार करणारे पी. एच. पाटील कोण, हे सभासदांना माहीत आहे. आम्ही चुकीचा कारभार केला असता तर ‘८८’च्या कारवाईला स्थगितीसाठी प्रयत्न केले असते. एकदा चौकशी होऊन जाऊ दे. ज्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांना पायदळी तुडविले, त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असा पलटवार शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष व सत्तारूढ पॅनेलचे नेते राजाराम वरुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. राजाराम वरुटे म्हणाले, स्वच्छ कारभार केल्यानेच ठेवी ८१ कोटींवरून २३७ कोटींवर पोहोचून बॅँक नफ्यात आली; पण गांधारीची पट्टी डोळ्यांवर बांधलेल्या विरोधकांना सगळीकडे काळेच दिसते. एकीकडे लाभांश दिला नाही म्हणून सभासदांसमोर बोलायचे आणि दुसरीकडे रिझर्व्ह बॅँकेच्या परवानगीशिवाय लाभांश दिला म्हणून सहकार खात्याकडे तक्रारी करणाऱ्यांचे बुरखे फाटले आहेत. हातकणंगले येथील जागेबाबत याच प्रवृत्तीने चुकीची तक्रार केली; पण चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. आरोप करणाऱ्यांच्या पतसंस्थेत १४ टक्के व्याजदर कसा? लेखापरीक्षण न करता सभा कशी होते? दुसऱ्यावर चिखलफेक करण्याअगोदर विरोधकांनी आपले हात पाहावेत. कार्यकर्त्यांच्या जिवावर संघटनेच्या माध्यमातून पुढे जायचे आणि स्वत:च्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनाच पायदळी तुडवायचे. केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून बॅँकेला वेठीस धरून बॅँकेच्या प्रगतीच्या आड येणाऱ्यांना सभासदच घरी बसवतील. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झटत आहे. ‘प्रशासकीय बदल्या रद्द’चा निर्णय, प्रशासकीय बदलीने गेलेल्या शिक्षकांना पुन्हा तालुक्यात आणले, पटाची अट न ठेवता मुख्याध्यापक द्यावेत, अनेक प्रश्नांसाठी न्यायालयीन लढाई केली; पण यासाठी कोणाकडून एक पैसाही घेतला नाही. सहा वर्षे शिक्षक बॅँकेची उन्नती व शिक्षकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी घरदार सोडून अक्षरश: झपाटल्यासारखे काम केले, याची जाणीव सभासदांना असल्याने आमचा विजय निश्चित आहे. त्यांची तोंडे बंद का?जी मंडळी आज सत्तेसाठी पडद्यामागून पुन्हा बॅँकेत शिरू पाहत आहेत, त्यांनी २००९ ला बॅँकेची अवस्था काय केली होती? तत्कालीन संचालकांकडून भ्रष्टाचाराचे पैसे वसूल करा म्हणणाऱ्यांची तोंडे आता बंद का? पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांच्या पॅनेलमध्ये भ्रष्टाचारी संचालक किती आहेत? नैतिकता नसलेल्या मंडळींनी आरोप करताना आपण शिक्षक आहोत, याचे भान ठेवावे, असा टोलाही वरुटे यांनी हाणला.
‘८८’ची एकदा चौकशी होऊन जाऊ दे
By admin | Updated: April 2, 2015 00:39 IST