लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी इचलकरंजी येथील वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेस असोसिएशनशी खासदार धैर्यशील माने यांनी बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये प्रोसेस युनिटच्या झिरो डिस्चार्जच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घेऊ, अशी ग्वाही देण्यात आली.
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी खासदार माने यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन, स्वतंत्र प्राधिकरण करण्याची मागणी केली होती. याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाची तीव्रता कमी करण्याच्या हेतूने वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशन इचलकरंजी या कापड प्रोसेसिंग कारखानदारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार माने यांनी चर्चा केली. प्रोसेस युनिट असणाऱ्या कारखानदारांनी झिरो डिस्चार्जच्यादृष्टीने पाऊल उचलावे, जेणेकरून पंचगंगा नदीत प्रोसेस युनिटच्या माध्यमातून जाणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबेल, असे आवाहन खासदार माने यांनी केले. त्यास असोसिएशनने प्रतिसाद देत, झिरो डिस्चार्जच्यादृष्टीने खबरदारी घेण्याची ग्वाही दिली.
वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरिराज मोहता, लक्ष्मीकांत मर्दा, संदीप मोघे, संदीप साळगावकर, श्रीनिवास बोहरा, अजित डाके, विजय मोठे, राजेश सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळी :
पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी इचलकरंजी प्रोसेसिंग युनिटच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी खासदार धैर्यशील माने यांनी बैठक आयोजित केली होती.
(फाेटो - ०४०१२०२१-कोल-पंचगंगा)