लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जोतिबा चैत्र यात्रेकरिता वाडी रत्नागिरी येथे जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भक्तांची वाहने बंद पडली तर त्यांच्या मदतीला धावून मोफत दुरुस्तीसाठी कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनचे शंभरहून अधिक सभासद सज्ज असायचे. मात्र गेल्या वर्षांपासून सलग दुसऱ्यांदा ही यात्रा कोरोना संसर्गामुळे रद्द झाली. त्यामुळे सेवेची संधी पुन्हा हुकली. याची हुरहूर मनामध्ये राहू नये, याकरिता असोसिएशनच्या मोजक्याच सभासदांच्या उपस्थित पाचगाव येथे जोतिबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यामुळे सोमवारी यात्रेच्या निमित्त पाचगाव येथे नाना गवळी यांच्या उपस्थितीत जोतिबाच्या प्रतिमेचे पूजन मोजक्याच सभासदांच्या उपस्थित करण्यात आली यावेळी देवा जोतिबाच्या नावानं चांगभलं व लोकांना सुबुद्धी दे, शासनाची नियम पाळा, आणि कोरोना संकटापासून सर्व सर्व जगाची सुटका कर अशी प्रार्थना केली. यावेळी असोसिएशनचे संजय पाटणकर, रवी कांडेकरी, महादेव सावंत, माधव सावंत, बबन सावंत, गणेश हजारे, फिरोज पाचापुरे, अजित मोरे, धनंजय अस्वले उपस्थित होते. जोतिबा चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तू भाविक दर्शनासाठी वाडी रत्नागिरीतील जोतिबा डोंगरावर येतात. यादरम्यान त्यांची वाहने सततचा प्रवास केल्यामुळे बिघडणे, बंद पडणे व त्याचे टायर पंक्चर होणे, अशा संकटाचे वेळी कोणतीही मदत भक्तांना मिळत नव्हती. ही बाब जाणून कोल्हापूर जिल्हा टुव्हीलर असोसिएशनने २००१ साली यात्रेला येणाऱ्या भक्तांच्या दुचाकी मोफत दुरुस्त व पंक्चर काढून देण्याचे ठरविले. आलेला भक्त पुन्हा आपल्या घरी सुखरूप जावा. या उद्देशाने ही सेवा अखंडपणे २०१९ सालच्या चैत्र यात्रेपर्यंत सुरळीत सुरू होती.