कोल्हापूर : बहिणींची ताटातूट होऊ नये, या शुद्ध हेतूने संस्थेने सहा वर्षांवरील मुलीला दत्तक देण्यासाठी कायदेशीर परवानगी घेतलेली आहे. मात्र, अॅड. सुचित्रा घोरपडे यांनी या प्रकरणातून संस्थेला नाहक बदनाम केले आहे; तसेच गोपनीयतेचा भंग करीत संस्थेत संशयास्पद वातावरण असल्याचे दाखविले आहे. हे दत्तक प्रकरण न्यायालयात असल्याने कोर्टावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती बालकल्याण संकुलाचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, मानद कार्यवाह भिकशेठ पाटील व पद्मा तिवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले, शासन, बालन्यायालय, चाईल्ड वेल्फेअर कमिटी, चॅरिटी कमिशनर, बालकल्याण समिती यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या संस्थेत आजवर कोणतेही काम बेकायदेशीरपणे झालेले नाही. आधीच पालकांचे छत्र हरपलेल्या बहिणींची ताटातूट होऊ नये, हा शुद्ध हेतू ठेवून कारा गाईडलाईन्सनुसार मोठी मुलगी सहा वर्षांच्या वरील वयोगटातील असली तरी तिला दत्तक देण्यासाठी आयुक्तालयाचीही परवानगी घेतली आहे. मुलीला दत्तक देण्यासाठीच्या सर्व कायदेशीर बाबी, परवानगीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. तरीही संस्थेवर विनाकारण आरोप केले जात आहेत. यापूर्वी दोन खटल्यांमध्ये घोरपडे यांनी सात ते आठ वर्षे दिरंगाई केली होती. या प्रकरणातही घोरपडे यांनी संस्थेला चुकीचा सल्ला दिला. गेल्या दीड वर्षापासून त्यांच्याकडे १७ खटले प्रलंबित आहेत. इतर दत्तक कामांत दिरंगाई करणे, पालकांना त्रास देणे, पालकांना फोनवरून धमकावणे, वारंवार सांगूनही कामात बदल न केल्याने त्यांनी या केसचे कामकाज पाहू नये, असे त्यांना लेखी कळविण्यात आले. शिवाय, १७ प्रकरणांची फी त्यांना आधीच अदा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी सूडबुद्धीने कोर्टात रखडलेली इतर दत्तक प्रकरणे चालवली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न केला. अखेर त्यांना काढून दुसऱ्या वकिलांमार्फत ही प्रकरणे मार्गी लावली गेली.बहिणी आनंदात...भिकशेठ पाटील म्हणाले, या प्रकरणातील मोठी मुलगी अकरा व लहान मुलगी साडेपाच वर्षांची आहे. या दोघींची ताटातूट होऊ नये, यासाठी गेली बरेच वर्षे आम्ही प्रयत्न करीत होतो. आमच्या अपेक्षेप्रमाणे कुटुंब मिळाले. वर्षभरापूर्वी या दोघींना संबंधित पालकांकडे सांभाळण्यास दिले आहे. कायदेशीररीत्या दत्तक प्रक्रिया पूर्ण व्हायची असली तरी या दोघी या कुटुंबात आनंदाने राहत आहेत.
सुचित्रा घोरपडे यांच्यावर कायदेशीर कारवाई
By admin | Updated: November 14, 2014 23:57 IST