ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 9 - कोणत्याही देशाच्या चलनावर एखादे चित्र, छायाचित्र, एखादी संकल्पना येणे हे खूपच मोलाचे असते. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'साठी बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये निर्मिती ग्राफिक्स या जाहिरात संस्थेचे संचालक अनंत खासबारदार यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाला देशभरातून पहिला क्रमांक मिळाला. त्यांनी निर्माण केलेले बोधचिन्ह आता भारतातील नव्या चलनातील नोटांवरही दिसणार आहे.
दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाचे बनवलेले बोधचिन्ह अशा पद्धतीने नोटांवर छापण्यात येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया अनंत खासबारदार यांनी दिली आहे. महात्मा गांधी यांच्या चष्म्याच्या वापर करत खासबारदार यांनी केलेले हे बोधचिन्ह देशपातळीवरील स्पर्धेत अव्वल ठरले होते.
'कोणत्याही देशाच्या चलनावर अशा पद्धतीने बोधचिन्ह,छायाचित्र वापरताना योगदानाचा विचार केला जातो. पंतप्रधान नरेंद्र यांनी स्वच्छतेसाठीचे आम्ही केलेले हे बोधचिन्ह चलनी नोंटावर प्रसिद्ध करण्यासाठीचा निर्णय घेत देशभरातील काळ्या पैशाच्या रूपामध्ये असलेली घाण स्वच्छ केली जाणार असल्याचे संकेतच दिले आहेत. माझे हे बोधचिन्ह चलनी नोटांवर आल्याने आता घराघरात गेले. कोल्हापूरच्या मातीत निर्माण झालेले हे बोधचिन्ह चिरंतन झाल्याचे खूप मोठे समाधान मला आहे', अशी प्रतिक्रिया अनंत खासबारदार यांनी दिली आहे.