कोल्हापूर : न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांचे शनिवारी येथे शाहू स्मारक भवनात व्याख्यान होत आहे. दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत पाटगांवकर यांच्या प्रथम वर्ष स्मृतिदिनानिमित्त पाटगांवकर यांच्या विविध भाषणांचे संकलन असलेल्या ‘परिसस्पर्श’ या पुस्तकाचे प्रकाशन चपळगांवकर यांच्या हस्ते होत आहे. सायंकाळी पाच वाजता हा समारंभ होईल. दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय, निसर्गमित्र, महिला दक्षता समिती, जनस्वास्थ दक्षता समिती आणि पाटगांवकर कुटुंबीय यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर असतील.‘परिसस्पर्श’ या पुस्तकाचे शब्दांकन पी. टी. पाटील यांनी केले आहे. या पुस्तकामध्ये प्रा. पाटगांवकर यांनी दिलेली व्याख्याने, त्यांचे विविध नेत्यांशी असलेले संबंध, तसेच त्यांच्या जीवनातील आठवणी यांचे संकलन, मुलाखती टेप करून ती लेखनबद्ध केली आहेत. दलितमित्र बापूसाहेब पाटील यांचे जीवनचरित्र व संबंधित संस्थांचे कार्य याची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी होणार आहे. या पुस्तकामुळे कोल्हापुरातील साधारणत: पस्तीस वर्षांतील सामाजिक चळवळींचे चित्ररूप दर्शनही होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक अनिल चौगले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
न्यायमूर्ती चपळगांवकर यांचे शनिवारी व्याख्यान
By admin | Updated: December 11, 2014 00:02 IST