कोल्हापूर : निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले,काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले परवा म्हणे पुण्यात जाऊैंन पिण्यात गेले.., पूर्वी स्वयंपाकघरात शडज् लागायचा सकाळी सकाळी, आता सगळे बेहोष होताहेत तिच्या रिमिक्सवर, असे विडंबन करीत कवितेच्या प्रांगणात मुक्तपणे मिश्किली करत ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी रसिकांना लोटपोट हसविले. दीड तासांहून अधिक काळ रंगलेल्या या काव्यमैफलीत हास्याचा झरा जणू दुथडी भरून वाहत राहिला. कोल्हापूर प्रेस क्लब व अक्षरदालनच्या विद्यमाने आज, सोमवारी कवी नायगांवकर यांच्या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘अक्षरदालन’चे रवींद्र जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. गद्य आणि पद्य स्वरूपात असलेल्या या मैफलीत नायगांवकर यांनी सार्वजनिक जीवनात घडत असलेल्या छोट्या-छोट्या प्रसंगांची विनोदी शैलीने मांडणी करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आज आपण सगळेच गद्यप्राय देशात राहतोय, काव्य असे काही राहिलेच नाही...याची जाणीव देत ते म्हणतात, जेव्हा कोणत्याही कामाची फाईल एका टेबलाहून दुसऱ्या टेबलावर आपोआप हालायला लागेल तेव्हा देशात काही चांगले घडतेय, असे वाटायला लागेल. मी एका बँकेत गेलो तर तिथे सगळीकडे टायरच टायर लावले होते. मॅनेजरना विचारले, बाबा रे असं का तर म्हणाला, बँक बुडू नये म्हणून लावलेत.., आणखी एका को. आॅपरेटिव्ह बँकेने खाते उघडणाऱ्या खातेदाराला दळण मोफत देण्याची योजना जाहीर केली होती...सुटाबुटातले अधिकारी दळणाचे डबे घेऊन फिरत होते. अशा प्रासंगिक विनोदांनी आज होणाऱ्या स्पर्धांवर बोट दाखविले.शिक्षणाच्या पद्धती आणि टीव्हीचे वाढलेले फॅड यावर ते म्हणतात, सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात आणि टीव्हीमुळे शिकलेले लोक पुन्हा निरक्षर राहतात. मंत्र्यांपासून, पोलीस, अधिकारी, न्यायव्यवस्था, बेकारी, सुरक्षा..या प्रश्नांचे विडंबन करताना बदललेल्या व्यवस्थेचे चिंतन करतात. पुण्यातल्या पाण्यात वेगळंच रसायन आहे याचा अनुभव ते लग्नसमारंभातल्या बफे सिस्टीममध्येही आलेल्या चणेवाल्या स्टाईलचे कौतुक मांडतात; पण मुंबईतल्या माणसांसारखी माणुसकी पुण्यात नाही मिळाली...कारण तेथे मुंबईतल्या लोकलमध्ये फीट किंवा चक्कर आलेल्या माणसालाही सगळे कसे दाबून धरतात, हे सांगितल्यावर मात्र त्याचा मतितार्थ कळतो. रिटायरमेंटनंतर फंड आणि ग्रॅज्युईटी जमा होईपर्यंत मुलं-बाळं कशी वागतात आणि त्यानंतर वस्सकन अंगावर येतात. हे वास्तव विनोदी अंगाने मांडत मर्मभेदी चिमटेही काढतात. यावेळी श्रीराम खाडिलकर, राम देशपांडे, श्याम कुरळे, विजय टिपुगडे, अजय दळवी आदी उपस्थित होते. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. पुरुष तरल आणि कोमलपुरुष अतिशय कोमल आणि नाजूक भावना असलेला असतो. याचा प्रत्यय स्वयंपाकघरात येतो. मेथीची एक जुडी त्यांना वेचायला द्या, म्हणजे लक्षात येईल...ही कविता सादर केल्यानंतर अनेकांनी माणसं, प्राण्यांवर कविता केल्या असतील, पण भाज्या आणि फळांच्या दुखा:वर कविता करणारा मी एकमेव कवी असल्याचे सांगत स्वत:चे वेगळेपणही त्यांनी मांडले.
हास्याचा झरा वाहिला दुथडी भरून
By admin | Updated: December 2, 2014 00:15 IST