कोल्हापूर: बालकल्याण संकुलला एक लाखाची मदत देऊन चौगुले कुटुंबीयांनी डॉ. अरुण चौगुले यांच्या स्मृती जपतानाच सामाजिक बांधिलकीचाही आदर्श घालून दिला. मदतीचा धनादेश आरती अरुण चौगुले व मनीष चौगुले यांच्या हस्ते संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर यांच्याकडे सुपुर्द केला.
बालकल्याण संकुल ही समाजातील अनाथ, निराधार, निराश्रीत तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी काम करते. संस्थेचा व्याप मोठा असल्यामुळे दानशुरांकडून सातत्याने मदतीचे आवाहनही केले जाते. याला प्रतिसाद देत कोल्हापुरातील चौगुले या कुटुंबीयांनी मदत देण्यास इच्छुक असल्याचे संस्थेला कळवले. त्याप्रमाणे चौगुले यांच्या पत्नी अरुणा व त्यांचे चिरंजीव मनीष यांनी बालकल्याण संकुलमध्ये एक लाखाचा धनादेश संस्थेकडे देत अनाथ मुलांच्या जडणघडणीत स्वत:चेही योगदान दिले.
यावेळी संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, सहकार्यवाह एस.एन.पाटील, विश्वस्त कुलदीप कामत, प्रदीप कापडिया, निरंजन वायचळ, सल्लागार सदस्य डॉ. मोहन पाटील, बालन्याय मंडळाचे सदस्य संजय देशपांडे, सीपीआरच्या ॲड. गौरी पाटील, अधीक्षक महेंद्र अष्टेकर यांनीही उपस्थिती लावत या अनाथांच्या प्रति ऋणानुबंध अधिक दृढ केले.
फोटो : २३०६२०२१-कोल-बालकल्याण संकुल
फोटो ओळ: कोल्हापुरातील बालकल्याण संकुलला डॉ. अरुण चौगुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चौगुले कुटुंबीयांनी लाखाच्या मदतीचा धनादेश संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर यांच्याकडे सुपुर्द केला.