कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) येथे उत्खननात सापडलेला तलाव हा १२४० ते १३४० या कालखंडातील असल्याचा अंदाज इतिहास संशोधक व पुरातत्व विभागाने वर्तवला आहे. आज इतिहास व मूर्तिशास्त्र अभ्यासक उमाकांत रणिंगा यांनी या तलावाला भेट दिली. हा मराठेशाही अथवा अदिलशाही काळातील बांधला नसल्याचे सांगितले.
वाकरे गावाला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तळ्यातील गाळ काढून येथे सौर पॅनेल उभारण्याचे काम सुरू असताना दहा फूट खोलवर रेखीव व चकाकणाऱ्या जांभ्या दगडाचे बांधकाम असणाऱ्या पायऱ्या लागल्याने गाळ काढण्याचे काम अत्यंत सावधपणे सुरू केले.
येथे पूर्व-पश्चिम बांधकाम असलेले चौरस तळे सापडले आहे. आज इतिहास संशोधक मूर्तिशास्त्र अभ्यासक उमाकांत रणिंगा, विकास नाईक कोल्हापूर हेरिटेजच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे यांनी आज या तलावाला प्रत्यक्ष भेट दिली.
यावेळी उमाकांत रणिंगा म्हणाले या तलावासाठी वापरण्यात आलेला जांभा दगड या भागात सापडत नाही. जवळपास शंभर किलोमीटरवरून दगड तलावाच्या बांधकामासाठी आणलेला असावा. तलावाचे बांधकाम मराठेशाही अथवा इस्लामिक काळातले नाही की नक्की आहे. हे बांधकाम १२४० ते १३४० या कालखंडातील असल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षणातून समोर येत आहे तळ्यातील दहा टक्केच गाळ काढण्यात आलेला असल्याने आणखी काही दिवस याबाबत माहिती मिळवण्यासाठी लागतील, असे सांगितले. गाळ काढण्यासाठी तलावाच्या ईशान्य बाजूने उतार असल्याने मार्गदर्शन करण्यात आले आहे, नैर्ऋत्य दिशेला हे तळे खोल आहे असे रणिंगांनी सांगितले.
शिलाहार राजाच्या काळातील बांधकाम
शिलाहार राजाच्या काळात तळ्याची अथवा मंदिरांचे बांधकाम काळ्या दगडात होते; पण या तळ्यासाठी वापरण्यात आलेला दगड जाम हा असल्याने शिलाहार काळात हे बांधकाम झाले नसावे. कदाचित यादवांच्या काळात लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी साठा मिळावा म्हणून हे बांधकाम केले असावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
तलावाच्या काठावर वसाहत असावी
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश पौराणिक तलाव हे उंच ठिकाणावर बांधण्यात आलेले आहेत; पण हा तलाव सखल भागात दिसत असल्याने या तलावाच्या बाजूला वसाहत असावी आणि कालांतराने ती येथून विस्थापित झाली आहे असा अंदाज की उमाकांत रणिंगा यांनी सांगितला.
तलाव आठशे वर्षांपूर्वीचा
तलावाच्या कालखंडबाबत अंदाज बांधण्यासाठी दहाव्या शतकापासून ताम्रपट गावातील वीरगळी यांचा अभ्यास करावा लागेल जेणेकरून या तलावाबाबत खर्चाच्या नोंदी सापडतील वयाचा कालखंड निश्चित करता येईल असे सांगताना उमाकांत रनिंग म्हणाले हा तलाव सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचा असल्याच्या पाऊलखुणा दिसतात.
(फोटो)
करवीर तालुका वाकरे येथे तलावाची पाहणी करताना मूर्तिशास्त्र अभ्यासक उमाकांत रनिंग कोल्हापूर हेरिटेज अध्यक्ष अमरजा निंबाळकर पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे, सरपंच वसंत तोडकर.