अमर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : उपनगरात महापालिकेची जवळपास १४ लहान-मोठी उद्याने आहेत. या उद्यानात प्रदूषणमुक्त वातावरणात पहाटे व सायंकाळी व्यायाम, फिरावयासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला व युवतींची संख्या अधिक आहे. पण बहुतांशी उद्यानांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहांची स्वतंत्र सुविधाच नसल्याने प्रचंड कुचंबणा होत आहे. उपनगरात नाळे कॉलनी उद्यान, त्रिमूर्ती कॉलनी उद्यान, तात्यासो मोहिते कॉलनी उद्यान, छत्रपती शहाजी उद्यान, शेळके उद्यान, रंकाळा उद्यान, जुना वाशी नाका लगतचे विस्तीर्ण उद्यान ही मोठी तर बरीच कॉलनी अंतर्गत लहान- मोठी उद्यानेही आहेत. या उद्यानात पदपथावर चालण्याचा व्यायाम करणारे, प्राणायाम, सूर्यनमस्कार व अन्य व्यायाम करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. बहुतांशी उद्यानात स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने पुरुष लघुशंकेसाठी झाडांचा आधार घेतात. या उद्यानात महिलांसाठी स्वतंत्र्य स्वच्छतागृहे नसल्याने महिलांना गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. उद्यानामध्ये स्वच्छतागृहे नसणे ही गंभीर बाब आहे. उद्यानांमध्ये पुरुष स्वच्छतागृह विनासायास जागा शोधतात. खरा त्रास सहन करावा लागतो तो महिलांना. गेल्या दोन वर्षांत दोन महिला महापौर झाल्या, पण या प्रश्नी प्रशासनासह त्यांचेही धोरण उदासीन असल्याने महिलांना प्रचंड कुचंबणा सहन करावी लागत आहे. पहाटे अथवा सायंकाळी विविध उद्यानात फिरायला येणारे नागरिक हे किमान तासभर वेळ या उद्यानात घालवतात. घरातून फिरायला निघाल्यापासून ते घरात परतेपर्यंत किमान दोन तास हे घराबाहेर असल्याने पुरुष सोडा पण स्वच्छतागृहांअभावी महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात मुत्रमार्गात होणाऱ्या संक्रमणाचे गंभीर आजार वाढताहेत. याशिवाय किडनीचे गंभीर आजारही बळावण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहेत.
उद्यानात स्वच्छतागृहाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 00:34 IST