कुरुंदवाड : शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या निमित्ताने येथील तबक उद्यानाची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे या उद्यानाने कात टाकली असून, ही स्वच्छता कायमस्वरूपी राहण्यासाठी पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे.शहराच्या मध्यभागी असलेले हे उद्यान ‘तबक उद्यान’ म्हणून संस्थानकाळापासून ओळखले जाते. जमिनीपासून १० ते १५ फूट खोली असलेले हे उद्यान पाऊस व शहरातील पाझर पाण्याने नेहमी भरलेले असते. कालांतराने पावसाचे घटलेले प्रमाण, शहरातील सांडपाण्यासाठी झालेल्या गटारी यांमुळे या तलावाला पाझर कमी झाल्याने पावसाळा वगळता हे उद्यान कोरडेच राहते. शहराची वाढती लोकसंख्या, मोक्याची जागा असल्याने पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जिम्नॅशियम हॉल व तलावाभोवती प्रेक्षक गॅलरी बांधली आहे. खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या शहराला या मैदानामुळे संयोजक व खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारे ठरले आहे. मोठे मैदान, प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी, स्टेज व जिम्नॅशियम हॉल यांमुळे क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली. मात्र, पावसाळ्यात पाणी साचून राहत असल्याने व पालिकेच्या दुर्लक्षामुळे हिरवळ व घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी सुटते. अस्वच्छतेमुळे या स्टेडियम भोवताली असणारे भाजी मंडईवाले, हॉटेल व्यावसायिक हेही यातच कचरा टाकत असल्याने अस्वच्छतेत अधिकच भर पडत आहे.या उद्यानात १० ते १४ डिसेंबर अखेर राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या संयोजकामध्ये स्वत: नगराध्यक्ष संजय खोतच असल्याने उद्यानाची स्वच्छता, जमीन सपाटीकरणाची मोहीम युद्धपातळीवर चालू आहे. उद्यानातील पाणी निचरा करणारी योजना पालिकेने केली आहे. या स्वच्छता व दुरुस्तीमुळे तबक उद्यानाच्या सौंदर्यात वाढ झाली असून, सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी पालिकेने याकडे वारंवार लक्ष देण्याची गरज आहे.नगराध्यक्ष संजय खोत, उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे, माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, सभापती वैभव उगळे, व्हॉलिबॉल संयोजन समितीचे अध्यक्ष बी. डी. सावगावे, बाळासाहेब देसाई, आदी स्वच्छता मोहीम राबवत आहेत. (वार्ताहर)
कुरुंदवाडचे तबक उद्यान कातटाकणार
By admin | Updated: November 26, 2014 00:08 IST