कोयनानगर : कोयना धरण परिसर आज, सोमवारी दुपारी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.९ नोंदविली गेली. या भूकंपाचे धक्के कोयना, चिपळूण परिसरातही जाणवले.कोयना परिसरात आज दुपारी २ वाजून ४ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून पश्चिमेला नऊ किलोमीटर अंतरावर पोफळी गावाजवळ होता. याची खोली पाच किलोमीटर होती. यामुळे कोयनानगर, पाटण, चिपळूण, आदी परिसरातील काही भागांमध्ये धक्के जाणवले. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आजही कायमच आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी बहुतांश लोक घरातच होते. दुपारी झालेल्या धक्क्यानंतर घरावरील पत्रे हादरले. तसेच फळीवरील साहित्य खाली पडले. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर लोक घरातून बाहेर आले. यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.दरम्यान, आज बसलेल्या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल असल्याने हा धक्का तृतीय श्रेणीचा होता. या भूकंपामुळे कोयना धरणास कोणताही धोका नाही, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)
कोयना परिसर भूकंपाने हादरला
By admin | Updated: August 5, 2014 00:12 IST