शिरोळ : येथील आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेच्या वतीने शिरोळ येथे कोविड मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मदत केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.
कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना सरकारी केंद्रात चांगले उपचार मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, खासगी रुग्णालयांच्या बिलाबाबत तक्रारींचे निरसन करणे, रेमडिसिविर योग्य किमतीत मिळविण्यासाठी रुग्ण व प्रशासन यांच्यामध्ये माध्यम म्हणून काम करणे, शासनाच्या लसीकरण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी प्रबोधन करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्यास मदत करणे या उद्देशाने हे कोविड मदत केंद्र सुरू केले आहे. गरजूंनी ‘आंदोलन अंकुश’च्या पदाधिकारी व कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन चुडमुंगे यांनी केले आहे.