कोल्हापूर : महापालिकेची आगामी निवडणूक कधीही लागेल अशी परिस्थिती असताना भाजपच्या महानगर कार्यकर्त्यांमधील धुसफूस वाढत आहे. गुरुवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. कोल्हापुरातील भाजप केवळ चौघेजण चालवतात असा स्पष्ट आरोप असलेल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सध्या भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई आणि विजय जाधव यांच्याबद्दल हा मुख्यत: रोष आहे. परंतु पक्ष म्हणून ते चौघेच जास्त सक्रिय आहेत हेदेखील तितकेच खरे आहे.
राजकीय पक्ष म्हटले की मतभेद आलेच. परंतु शिस्तबद्ध पक्ष म्हणवून घेणाऱ्या आणि प्रदेशाध्यक्षपदच ज्या शहरात आहे अशा कोल्हापूरच्या भाजपमध्येही सर्व काही आलबेल नाही हेच यावरून स्पष्ट झाले आहे. चंद्रकांत पाटील हे मंत्री असतानाही कोल्हापुरात पक्ष वाढला नाही आणि आता तो वाढत नाही. याला पक्षातील चौघेजणच कारणीभूत असून, पाटील व्यक्तीश: चांगले असले तरी त्यांच्याभोवतीची चौकडी प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही, असेही अन्याय झालेल्या कार्यकर्त्याने या पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्याला जिल्हा सरचिटणीस दिलीप मैत्राणी यांनी सोशल मीडियावर उत्तर दिले आहे. परंतु त्यांनीही पक्षात कोण नाराज नाही आणि असलेच तर कोण उघड बोलणार नाही, असे म्हणत एका अर्थाने दुजोराच दिला आहे. भाजपमध्ये सर्वांना संधी दिली जाते असा माझा ३० वर्षांचा अनुभव आहे. सर्वांचे ऐकूनही घेतले जाते असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील आज शुक्रवारी कोल्हापुरात येणार आहेत. येत्या चार दिवसात ते अनेकांच्या घरी भेटणार आहेत. गेल्या आठवड्यात अशाच त्यांनी काही ठिकाणी भेटी दिल्या. काही जणांच्या घरी ते गेले नाहीत यावरून आता भाजपमध्ये वाद सुरू आहे. आमची नावे यादीतून मुद्दाम काढली असा काही पदाधिकाऱ्यांचा आक्षेेप आहे. गुरुवारी सकाळी भाजप कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही हा मुद्दा निघाला. परंतु ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी समजूत काढून हा विषय संपवला.
चौकट
भाजप.. महाडिक गट एकजिनसीपणा नाहीच
धनंजय महाडिक जरी भाजपमध्ये येऊन दोन वर्षे होत आली असली तरी भाजप आणि महाडिक गट यांचा एकजिनसीपणा अजून दिसत नाही. जेव्हा चंद्रकांत पाटील आंदोलनात असतात तेव्हा धनंजय महाडिक, अमल महाडिक, समरजित घाटगे सर्वजण उपस्थित असतात. पण इतरवेळी शहरातील आंदोलनातही महाडिक असतील तरच त्यांचे समर्थक उपस्थित राहतात असे चित्र दिसत आहे.
चौकट
येणाऱ्या काळात भाजपची परीक्षा
प्रदेशाध्यक्ष पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता अधिक वेळ द्यावा लागणार आहे. कारण जिल्हा बँक, महापालिका, विधान परिषद जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुश्रीफ यांच्यावरील आरोपानंतर कॉंग्रेस आणि शिवसेना मुश्रीफांच्या पाठीशी ठामपणे राहिली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या निवडणुकांना सामोरे जाणे भाजपसाठी म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही.