आवडीच्या क्रमांकांतून आरटीओला वर्षभरात पाच कोटींची कमाई : शुल्कात होणार वाढ
सचिन भोसले ,लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोल्हापूरकरांचे जसे वाहन प्रेम सर्वश्रूत आहे. मग ती दुचाकी असो वा चारचाकी त्याकरीता आवडीच्या क्रमांकासाठी अगदी चार चार लाखांची बोली बोलणारेही इथेच भेटणार. अशा पसंतीच्या क्रमांकापोटी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०१९-२० या सालात तब्बल पाच कोटींची कमाई केली.
वाहन बाजारात लाख नव्हे तर कोटी रुपये किमतीचे दुचाकी असो वा चारचाकी ते आपल्या दारात हवी, असा चंग कोल्हापूरकरच बांधतात. अशा वाहनांकरीता मग आवडीचा क्रमांक ओघाने आलाच म्हणून समजा. हव्या त्या क्रमांकापोटी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरात ५ कोटींचा महसूल मिळविला.
मागील आठवड्यात एफआर ही नवी सिरीयल सुरू झाली. पहिल्या तीन दिवसांत ५०० हून अधिक क्रमांक जादाचे पैसे भरून वाहनधारकांनी घेतला. तर रोज हव्या त्या क्रमांकासाठी ४०० ते ४५० इतके अर्ज कार्यालयाला प्राप्त होतात. एकाच क्रमांकाला जर जादा मागणी आली तर त्या क्रमांकाचा लिलाव केला जातो. त्यातून ज्याची बोली अधिक त्याला तो क्रमांक बहाल केला जातो. दिवसेंदिवस नऊ, चोवीस, १०८ , १००८ यासह सहा बेरीज येणाऱ्या क्रमांकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ज्या क्रमांकाला व्हीआयपी किंवा फॅन्सी क्रमांक म्हणून जादाचे पैसे भरावे लागत नाहीत. अशा क्रमांकाचेही लिलाव होत आहेत. विशेषत: एक, नऊ, २४, या क्रमांकासाठी वाहनधारकांनी २ ते चार लाख रुपये लिलावातून मोजले आहेत. चारचाकीचा क्रमांक दुचाकीलाही लिलावातून अधिकचे पैसे मोजून वाहनधारकांनी मिळविला आहे. पर्यायाने आरटीओच्या महसुलात वाढ होत आहे.
या क्रमांकांना अधिक मागणी
विशेष म्हणजे ६, २४ . ७, ९, ९९, ९०, १०८, ९९९, १२ ते ३० यामधील क्रमांकांना अधिक मागणी आहे. नावडता क्रमांक म्हणून ४, ८ या क्रमांकांकडे पाहिले जाते.
‘दादा’, ‘मामा’ क्रमाकांची मागणी वाढली
२१४ (राम), २१५१ (राज), ४१४१ (दादा), ८०५५ (बाॅस), ४९१२(पवार), १०१० (दहादहा) अशा क्रमांकानाही मागणी वाढली आहे.
जुने शुल्क असे,
०१- चारचाकी (४ लाख) दुचाकी (५० हजार)
०९-चारचाकी (१ लाख ५० हजार) दुचाकी (२० हजार)
११, १११, २२२, ४४४, ५५५, ७७७७, - चारचाकी (७० हजार) दुचाकी (१५ हजार)
नवे शुल्क असे,
०१ - चारचाकी (५ लाख), दुचाकी, तीन चाकी (१ लाख)
०९, ९९, ७८६, ९९९, ९९९९ - चारचाकी (२ लाख ५० हजार), दुचाकी (५० हजार)
१११, २२२, ३३३, ४४४ ७७७७, - चारचाकी (१ लाख), दुचाकी (२५ हजार)
२,३, ४, ५, ६, ७, १०, ११, २२, ३३, - चारचाकी (७० हजार) दुचाकी (१५ हजार)
कोट
नऊ क्रमांक कुठल्याही आकड्यांमध्ये अधिक केला तर त्याची बेरीज ९ येते. त्यात कोल्हापूरचा वाहन क्रमांक सिरीज एमएच-०९ आहे. त्यामुळे सर्वार्थाने कोल्हापूरकर ९ क्रमांकाला अधिक पसंती देतात. वर्षभरात त्यामुळे ५ कोटींचा महसूल जमा झाला.
- डाॅ. स्टीव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर