म्हाकवे : कोल्हापूर जिल्हा लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी मोठमोठी बांधकामे सुरू आहेत, अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्षपणे कामगारांच्या नोंदी घेतल्या आहेत. अशिक्षित, दुर्लक्षित, मागास भागांसह उच्चशिक्षित कामगारांना या संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात संघटनेला यश आले आहे. राज्य शासनाच्या नोंदीत असणाऱ्या सुमारे दोन लाख कामगारांपैकी तब्बल ४१ हजारांहून अधिक कामगारांची नोंद जिल्ह्यातून झाली आहे. परिणामी, संघटनेची भरभक्कम वज्रमूठ बनविण्यात संघटनेला मोठे यश आल्याची माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व राज्य समन्वय समितीचे राज्य खजानीस कॉ. भरमा कांबळे यांनी केरळ येथे सुरू असणाऱ्या कामगारांच्या राष्ट्रीय अधिवेशनात दिली. यावेळी भरमा कांबळे म्हणाले, मजबूत संघटना बांधणीचा कोल्हापूर पॅटर्न महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, संघटनेच्या सांख्यिकी दबावामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबांना संपूर्ण आरोग्य कवच, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती यासह तब्बल २४ योजना लागू झाल्या आहेत. (वार्ताहर)
संघटना बांधणीचा ‘कोल्हापूर पॅटर्न’ आता जगभरात : कांबळे
By admin | Updated: November 10, 2014 00:46 IST