गणेश विसर्जन : पोलिसांची बघ्याची भूमिका; डॉल्बीही मुक्तपणे दणाणला; छोट्या मंडळांकडून नाराजी व्यक्त; मोठा वाद नाही, एवढीच समाधानाची बाब कोल्हापूर : पाटाकडील तालीम, प्रॅक्टिस क्लब, वाघाची तालीम, बालगोपाल, दयावान, महाकाली, अशा मोठ्या मंडळांनी पहाटेपर्यंत महाद्वार रोड काबीज केल्याने मिरवणूक रेंगाळली. या मंडळांमधील अंतर दिसत असूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने मुख्य मार्गावर सुमारे पाच तासांहून अधिक काळ या मंडळांच्या कार्यकर्त्यांचा डॉल्बीच्या दणदणाटांवर जल्लोष सुरू राहिला. रात्री बाराच्या सुमारास पापाची तिकटी येथे झुंजार क्लब व बाजार गेट मित्रमंडळ यांच्यात मिरवणूक पुढे नेण्यावरून वाद झाला.रात्री नऊच्या सुमारास पाटाकडील, प्रॅक्टिस क्लब, उमेश कांदेकर युवा मंच, वाघाची तालीम, झुंजार क्लब ही मंडळे बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर चौक ते पापाची तिकटी या मार्गावर होती. दुसऱ्या बाजूला ताराबाई रोडवरून दयावान ग्रुप मुख्य मिरवणुकीत प्रवेश करण्याच्या तयारीत होते. त्या पाठोपाठ हिंदवी तरुण मंडळ, बाबूजमाल तालीम मंडळ, आदी मोठी मंडळे होती. ‘पाटाकडील’ पाठोपाठ दयावानला पोलिसांनी एंट्री दिली. आधीच मोठ्या मंडळांनी काबीज केलेल्या या रस्त्यावर आणखी एका मोठ्या मंडळाची भर पडली. सर्वच मंडळांचे डॉल्बी असल्याने या मार्गावर नुसता डॉल्बीचाच दणदणाट होता. त्याच्या ठेक्यावर तरुणाई बेधुंद होऊन थिरकत होती. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. रात्री बाराच्या सुमारास पापाची तिकटी येथे महाद्वार रोडवरून आलेल्या झुंजार क्लबला थांबवून चप्पल लाईनकडून आलेल्या बाजार गेट मित्रमंडळाला पुढे जाण्यास परवानगी दिली. याला झुंजार क्लबच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. यामुळे किरकोळ वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून बाजार गेट मंडळानंतर तुम्हाला सोडले जाईल, असे सांगितल्यानंतर हा वाद थांबला.रात्री एकच्या सुमारास महाद्वार रोडवर पाटाकडीलसह पी. एम. बॉईज, वाघाची तालीम, बालगोपाल तालीम, प्रॅक्टिस क्लब या मंडळांमध्ये खूप अंतर दिसत होते; परंतु पोलिसांनी कुणालाही मिरवणूक पुढे घ्या, असे सांगितले नाही. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरूच होता. त्यामुळे मिरजकर तिकटीकडून दिलबहार तालीम मंडळ, जुना बुधवार तालीम, चक्रव्यूह तरुण मंडळ, श्री तरुण मंडळ, तर खरी कॉर्नरकडून बीजीएम स्पोर्टस्, नाईट कट्टा या मंडळांना या ठिकाणी ताटकळत राहावे लागले. असे चित्र ताराबाई रोडवर हिंदवी, बाबूजमाल तालीमसह, आदी मंडळांचे होते.पहाटे सव्वातीनच्या सुमारास वाघाची तालीमने महाद्वार रोड सोडून पापाची तिकटी येथे एंट्री केली. त्यानंतर चार वाजता सणगर गल्ली तालीम, पावणेपाच वाजता पाटाकडील, पावणेसहा वाजता दयावान ग्रुपचे या ठिकाणी आगमन झाले. सकाळी सहाच्या सुमारास महाद्वार रोडवर हिंदवी व बाबूजमालचे आगमन झाले. त्या पुढे महाकाली तालीम, राजे संभाजी तरुण मंडळ, क्रांती बॉईज, दिलबहार, जुना बुधवार, नाईट कट्टा अशी मंडळे होती. या मोठ्या मंडळांनीच हा रस्ता सोडला नसल्याने बिनखांबी ते मिरजकर तिकटी या मार्गावर राम तरुण मंडळ, बागल चौक मित्रमंडळ, नंगिवली तालीम मंडळ, जय पद्मावती मंडळ, धर्मराज तरुण मंडळ, एकत्र सांस्कृतिक मंडळ, भगवा चौक तरुण मंडळ, संयुक्त शिवाजी चौक तरुण मंडळ, वाय. पी. पोवार मित्रमंडळ, आदी मंडळांना ताटकळावे लागले. (प्रतिनिधी)मिरवणुकीतील आकर्षण...!मंगळवार पेठेतील लेटेस्ट मित्रमंडळाने ‘फॉरेस्ट वाचवा’ संदेश देत मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यांनी जंगलामधील प्राणी, पक्षी वाचवा संदेश देताना कृत्रिम प्राणी आणले होते. तसेच चव्हाण गल्लीतील डी. डी. जाधव गु्रपने ‘पाणी वाचवा’, तर मंगळवार पेठेतील महिलांनी भगवे फेटे परिधान करून लक्ष वेधून घेतले होते. न्यू फं्रट अँड स्पोर्टस् अँड कल्चर गु्रपने ‘स्त्री जन्माचे स्वागत’ असा सजीव देखावा आणला होता. तसेच श्रीराम तरुण मंडळाने मुंबईचे नृत्यपथक, शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळ ट्रस्टने येवती (ता. करवीर)चे झांजपथक, सनी स्पोर्टस्, गंगावेशमधील धोत्री तालीम मंडळाने पडळ खुर्दचे झांजपथक, रामानंदनगर मंडळ, दैवज्ञ बोर्डिंगचे ‘लेझीम पथक’ मिरवणुकीत आकर्षण ठरले.टोल देणार नाही...तुकाराम माळी तालीम मंडळाचा एक कार्यकर्ता गणेशाचे रूप घेऊन मिरवणुकीत सहभागी झाला होता. लहान दुचाकीवरून मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या या ‘गणेश’ने ‘टोल देणार नाही’, असा फलक दर्शवून कोल्हापूरकरांची टोलबाबतची भावना व्यक्त केली. मिरवणुकीत ‘दुचाकीवरील गणेश’ हा बालचमूंचा आक र्षण ठरले.इच्छुकांचा प्रचारसंपूर्ण मिरवणुकीच्या आठही मार्गांवर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रचाराचे फलक लावले होते. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या आंदोलनाची झलक मोठ्या स्क्रिनद्वारे गणेश भक्तांना दाखविली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे थेट पाईपलाईन वचनपूर्तीचे फलकही मिरवणूक मार्गावर दिसत होते.मोफत रुग्णसेवामहापालिका, राष्ट्रवादी, व्हाईट आर्मीतर्फे मिरवणूक मार्गांवर रुग्णवाहिकेंची सोय करण्यात आली होती. सर्व सोयीनियुक्त व वैद्यकीय तज्ज्ञांसह डॉ. संदीप पाटील हे रुग्णसेवेसाठी टीमसह रात्रभर मिरवणूक मार्गावर थांबून होते. जुन्या गीतांची आवड...‘मैं हूँ डॉन’पासून ते ‘मोहिनी, मोहिनी’ , ‘टीप... टीप... बरसा’पर्यंत आणि ‘पोलीसवाल्या, सायकलवाल्या’ या गीतांची क्रेझ मिरवणुकीत दिसली.किरकोळ वाद...विसर्जन मिरवणुकीवेळी मिरजकर तिकटी येथे सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळ व रविवार पेठेतील दिलबहार तालीम मंडळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गणेशमूर्ती पुढे नेण्यावरून किरकोळ बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाद मिटवला. त्यानंतर असाच वाद पीटीएम व शनिवार पेठेतील एस. पी. बॉईज यांच्यात ओशो हॉटेलजवळ झाला.‘जुना बुधवार’ २३ तास एका जागेवर... जुना बुधवार तालीम मंडळाने बिनखांबी गणेश मंदिर येथील महालक्ष्मी बँकेजवळ रविवारी रात्री ट्रॅक्टर आणून लावला होता. या मंडळाला मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर जाण्यासाठी तब्बल २३ तास लागले. मिरजकर तिकटीकडून येणाऱ्या प्रत्येक तालीम व तरुण मंडळाने डॉल्बी आणला होता. काल, सोमवारी १२ वाजण्याच्या सुमारास जुना बुधवार व ‘दिलबहार’चे ट्रॅक्टर एकमेकांजवळ लावले होते.‘खंडोबा’चा आदर्शखंडोबा तालीम मंडळाने यंदा डॉल्बी, बेंजो, ढोल-ताशे या वाद्यांना फाटा देत केवळ टाळ्यांच्या गजरात आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले. यावेळी परिसरातील महिला व पुरुष, असे दीड हजारांहून अधिक कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते. मुखी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत व टाळ्यांचा गजर करीत मिरवणूक काढली. या अत्यंत साध्या पद्धतीने केलेल्या विसर्जनाची चर्चा मिरवणुकीदिवशी शहरभर होती. हा आदर्श इतर मंडळांनीही जपला तर ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही नागरिकांनी बोलून दाखविली. ‘जुना बुधवार’ २३ तास एका जागेवर... जुना बुधवार तालीम मंडळाने बिनखांबी गणेश मंदिर येथील महालक्ष्मी बँकेजवळ रविवारी रात्री ट्रॅक्टर आणून लावला होता. या मंडळाला मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर जाण्यासाठी तब्बल २३ तास लागले. मिरजकर तिकटीकडून येणाऱ्या प्रत्येक तालीम व तरुण मंडळाने डॉल्बी आणला होता. काल, सोमवारी १२ वाजण्याच्या सुमारास जुना बुधवार व ‘दिलबहार’चे ट्रॅक्टर एकमेकांजवळ लावले होते.‘खंडोबा’चा आदर्शखंडोबा तालीम मंडळाने यंदा डॉल्बी, बेंजो, ढोल-ताशे या वाद्यांना फाटा देत केवळ टाळ्यांच्या गजरात आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले. यावेळी परिसरातील महिला व पुरुष, असे दीड हजारांहून अधिक कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते. मुखी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत व टाळ्यांचा गजर करीत मिरवणूक काढली. या अत्यंत साध्या पद्धतीने केलेल्या विसर्जनाची चर्चा मिरवणुकीदिवशी शहरभर होती. हा आदर्श इतर मंडळांनीही जपला तर ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही नागरिकांनी बोलून दाखविली.
कोल्हापूर --मोठ्या मंडळांकडून मिरवणूक ‘हायजॅक’
By admin | Updated: September 10, 2014 00:27 IST