कोल्हापूर : येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आॅगस्ट २०१३ मध्ये झालेल्या शासकीय स्पर्धांचे उद्घाटन करताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी येथे सहा महिन्यांत सिंथेटिक टर्फ बसविण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, अद्याप यासाठीची कोणतीही हालचाल झालेली नाही, त्यामुळे मंत्र्यांची घोषणा हवेतच विरणार का? असा क्रीडाप्रेमींचा सवाल आहे.आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने नैसर्गिक गवतावर खेळण्यास बंदी केल्यामुळे देशांतर्गत हॉकी स्पर्धाही सिंथेटिक टर्फवर खेळणे बंधनकारक आहे. देशांतर्गत हॉकी स्पर्धा टर्फवर होत असल्यामुळे कोल्हापूरच्या खेळाडूंना सरावाअभावी या स्पर्धांमध्ये यश मिळविणे शक्य होत नाही. त्याचबरोबर कोल्हापुरातील क्रीडासंकुलाचे कामही दहा वर्षांपासून रेंगाळले आहे. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत २५ ते ५० एकर जागा उपलब्ध करून तेथे क्रीडासंकुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सरकारला अजून कोल्हापुरात जागा उपलब्ध करून देता आलेली नाही.मेजर ध्यानचंद स्टेडियमवर एकमेकाला लागून दोन हॉकी क्रीडांगणे आहेत. त्यांच्यावर सिंंथेटिक टर्फ बसविली, तर कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतील खेळाडूूंना त्याचा फायदा होऊ शकतो. यामुळे कोल्हापुरातही हॉकी कसोटी सामने खेळविण्यासाठी विचार होऊ शकतो.कोल्हापूरच्या खेळाडूंनी नेमबाजी, जलतरण, कुस्ती या खेळांमध्ये आॅलिम्पिक स्पर्धेंपर्यंत झेप घेतली आहे. मात्र, या खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात शासन नेहमीच उदासीन राहिले आहे. क्रीडा विभागाने येथील मागण्यांसंदर्भात नेहमीच टोलवाटोलवी केली आहे. (प्रतिनिधी)मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर टर्फ बसविल्यास पाच जिल्ह्यांतील हॉकीपटूंना आपली गुणवत्ता, वेग व कौशल्य वाढविण्यास मदत होईल. टर्फवरील सरावाअभावी राज्यपातळीवर सातत्याने यश मिळविणाऱ्या मुला-मुलींना राष्ट्रीय स्पर्धांत अपयश येते. त्यामुळे क्रीडा विभागाने तातडीने या मैदानावर सिंथेटिक टर्फ बसवावी.- कुमार आगळगावकर, ज्येष्ठ हॉकीपटू, प्रशिक्षक.कोल्हापुरात झालेले सामनेभारत-रशिया महिला हॉकी कसोटी सामना (१९८१)भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पुरुषांचा हॉकी कसोटी सामना (१९८६)२१ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धाअखिल भारतीय डॉ. आंबेडकर निमंत्रितांची वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धामहिला व पुरुषांच्या राज्य हॉकी स्पर्धा
कोल्हापूर--ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर टर्फ बसणार का ?
By admin | Updated: August 28, 2014 23:37 IST