कोल्हापूर : निसर्ग संवर्धन हे प्रमुख तत्त्व असलेला पाचवा ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ १८ ते २१ सप्टेंबर दरम्यान कोल्हापुरात होणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ सरव्यवस्थापक विश्वास पाटील व कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, शाहू स्मारक भवनमध्ये चार दिवस होणाऱ्या या महोत्सवात रसिकांना वेगवेगळ्या देशांतील पर्यावरणावर आधारित ३५ चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे ‘स्मॉल एफर्ट बीग डिफरन्स - प्रयत्न छोटा, बदल मोठा’ हे ब्रीदवाक्य आहे, तर रिफ्यूज (पर्यावरणास बाधक वस्तू नाकारा), रिड्यूस (निसर्गास बाधा आणणाऱ्या वस्तूंचा कमी वापर करा), रियूज (वस्तूंचा क्षमतेनुसार पुनर्वापर करा), रिसायकल (टाकाऊ वस्तूंपासून नवनिर्मिती करा), रिकव्हर (पाणी, विजेची बचत करून ऊर्जामूल्य वाढवा) या पाच ‘आर’च्या उद्दिष्टांतून उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धा, चर्चा, व्याख्यान, युवा संसद, निसर्ग भ्रमंती अशा उपक्रमांद्वारे पर्यावरण जागृतीचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी निसर्ग संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा व्यक्ती व संस्थांचा वसुंधरा मित्र, वसुंधरा गौरव व वसुंधरा सन्मान असे गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल. शालेय चित्रकला स्पर्धा व आंतरशालेय लघुनाटिका स्पर्धा राम गणेश गडकरी हॉलमध्ये सकाळी नऊ वाजता सुरू होतील. निसर्ग भ्रमंती सहभागासाठीची नावनोंदणी उद्या, बुधवारपासून दुपारी ३ ते ८ या वेळेत केली जाईल. विविध स्पर्धा व चित्रपट महोत्सवातील नावनोंदणीसाठी इच्छुकांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या जुना देवल क्लबजवळील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सदानंद पोसे, दिलीप बापट उपस्थित होते.
किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव १८ सप्टेंबरपासून
By admin | Updated: September 4, 2014 00:01 IST