कोल्हापूर : गतफुटबॉल हंगामातील हुल्लडबाजीमुळे यंदा जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पर्धा संयोजक, फुटबॉल संघ, व्यवस्थापन आणि के.एस.ए. यांच्यावर सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक अटी व शर्ती लावल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करूनच नव्या हंगामाला परवानगी देण्यात येईल, असे पोलीस प्रशानाच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र, काही अतिउत्साही प्रेक्षकांचा फटका कोल्हापूरच्या फुटबॉलला बसत आहे.कोल्हापूरचा फुटबॉल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आता कुठे उभारी येत आहे. या सर्व गोष्टींना खेळाडूंच्या कष्टाप्रमाणे क्रीडारसिकांची भूमिका मोठी आहे. मात्र, खेळाडूंमध्ये असणाऱ्या खिलाडूवृत्तीचा अभाव किंवा एखाद्या संघाचे समर्थन करताना समर्थकांकडून होणाऱ्या हुल्लडबाजीचा फटका कोल्हापूरच्या फुटबॉलला बसत आहे. त्याचा परिणाम सर्व फुटबॉल क्षेत्राला भोगावा लागत असल्याची प्रचिती यंदा सर्व फुटबॉलप्रेमींना येत आहे. गेल्यावर्षी एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी दोन तालीम मंडळांच्या झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम यंदाचा हंगाम लांबणीवर पडण्यावर झाला आहे. कोल्हापूरचा फुटबॉल वाढविणे तसेच स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी फुटबॉल खेळांशी निगडित असणाऱ्या सर्वच घटकांची आहे. ही आपली जबाबदारी नाही, अशी भूमिका घेऊन कोणी अंग झटकून चालणार नाही. या प्रकारामुळे फुटबॉल तर बंद होईल पण अनेक खेळाडूंच्या करिअरवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. कोल्हापूर फुटबॉल वाढविण्यास तसेच येथील खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. खेळाच्या नियमांची माहिती फक्त खेळाडूंनी नव्हे तर प्रेक्षकांनी करून घेणे गरजेचे आहे. पंच हेसुद्धा माणूसच आहेत. त्यांच्याकडून नकळत चूक होऊ शकते. एखादा पंच जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय देत असेल तर त्यासाठी सामन्यातील अन्य पंचाकडे संबंधित पंचाची तक्रार करू शकतात. त्यामुळे खेळाडू व संघव्यवस्थापकांनी संयम बाळगल्यास नक्कीच वाद टाळले जातील. - श्रीनिवास जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर सॉकर रेफी असोसिएशनअलीकडच्या काळात कोल्हापूरच्या फुटबॉलला मोठी उभारी मिळत आहे. अनेक संघ, खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू लागले आहेत. प्रेक्षक असू दे किंवा खेळाडू यांच्यातील स्थानिक वादामुळे कोल्हापुरातील फुटबॉल बॅकफुटवर जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक खेळाडूंचे नुक सान होत आहे. ते टाळण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. मैदानांतील वाद मैदानामध्येच मिटविणे गरजेचे आहे. - प्रदीप साळोखे, फुटबॉल प्रशिक्षक व पंच कोल्हापुरातील फुटबॉल थांबला की येथील खेळाडूंचे करिअर थांबल्यासारखे आहे. स्पर्धाच झाल्या नाही, तर टॅलेंट असूनसुद्धा काय उपयोग होणार आहे. या गोष्टी स्थानिक संघ, समर्थक व खेळाडूंनी लक्षात घेतल्या पाहिजेत. एखाद्याच्या चुकीचा फटका सर्वांनाच बसतो. त्यामुळे या गोष्टी रोखण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. - नीलेश ढोबळे, फुटबॉल खेळाडू पोलीस प्रशासनाच्यावतीने कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनकडे केलेल्या काही सूचना...शाहू स्टेडियमवर सुरू होणाऱ्या फुटबॉल सामन्यांची सविस्तर माहिती १५ दिवस अगोदर पोलीस प्रशासनास द्यावी.स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या फुटबॉल संघाचे नाव, प्रत्येक खेळाडू, संघ प्रशिक्षक, राखीव खेळाडूंच्या नावांची यादी स्वतंत्रपणे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सादर करावी.‘केएसए’च्या पदाधिकाऱ्यांची सविस्तर माहिती मोबाईल क्रमांकासहित पोलीस ठाण्यात सादर करावी.प्रत्येक सामन्यात कायमपणे आपल्याकडील एक जबाबदार संघटक व व्यवस्थापक नेमावा.स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडू, पंच व प्रशिक्षकांना आपल्याकडील नियमावलींबाबत मार्गदर्शन करावे. गैरवर्तन करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर आपल्याकडून कठोर कारवाई केली जाईल, याची कल्पना द्यावी.स्पर्धेच्या काळात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत तसेच चांगले सी.सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात यावे. एखादी घटना घडल्यानंतर त्याचे संपूर्ण रेकॉर्डिंग करून त्याची एक सीडी तत्काळ पोलीस ठाण्यात द्यावी.पोलीस बंदोबस्तासाठी वरिष्ठ कार्यालयाशी १५ दिवस अगोदर पत्रव्यवहार करावा.मागणी केलेल्या बंदोबस्ताप्रमाणे मंजूर केलेल्या पोलिसांचा मेहनताना पोलीस कारकुन जुना राजवाडा यांच्याकडे रोखीने भरणे गरजेचे आहे, अन्यथा बंदोबस्त देता येणार नाही. स्टेडियमची नियमित स्वच्छता ठेवावी. जेणेकरून प्रेक्षक गॅलरीत दगड, विटा, काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या राहणार नाहीत.सामना सुरू असताना मैदानामध्ये अथवा मैदानाबाहेर वाद झाल्यास त्या दिवशी मैदानामध्ये खेळावयास असतील त्या संघव्यवस्थापकांना जबाबदार धरण्यात येईल.शक्य झाल्यास बाहेर पंच मागवावेतया खेळाडूंच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा खेळाडूंबाबत स्थानिक पोलीस ठाण्याकडून ‘वर्तणूक दाखला’ घेण्यात यावा.
हुल्लडबाजीला ‘किक’, शिस्तीचा करा ‘गोल’
By admin | Updated: December 23, 2015 01:26 IST