कोल्हापूर : कर्नाटकातील येळ्ळूर येथे (जिल्हा, बेळगाव) मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आज, मंगळवारी शिवसैनिकांनी कोल्हापुरात बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या कर्नाटक पासिंगच्या आठ ट्रॅक्टरमधील हवा सोडली. तसेच कन्नड फलकांना काळे फासले. कर्नाटक पासिंग असलेले हे ट्रॅक्टरचालक शेतीकाम सोडून अन्य व्यवसायासाठी वापरून जनतेची धूळफेक करीत आहेत. बेकायदेशीररीत्या ते व्यवसाय करीत आहेत. या कारणावरून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर येथे शिवसैनिकांनी पाच ट्रॅक्टर अडवून त्यांच्या चाकातील हवा सोडली. ही माहिती कळताच पोलीस त्या ठिकाणी आले. तोपर्यंत शिवसैनिकांनी ट्रॅक्टरचालकांना चोप देऊन ट्रॅक्टरवरील कन्नड फलकांना काळे फासले होते.शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने घाबरलेल्या ट्रॅक्टरचालकांनी पळ काढला होता. यानंतर शिवसैनिकांनी उद्यमनगर येथील हुतात्मा पार्क उद्यानासमोर तीन ट्रॅक्टर अडवून त्यांच्या चाकातील हवा सोडली. पुन्हा दिसाल, तर याद राखा, असा गर्भित इशारा दिला.या आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, अनिल पाटील, विराज पाटील, विनोद खोत, भगवान कदम, अभिजित देशमाने, प्रवीण पालव, आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)कोल्हापुरात कन्नडिगांकडून ट्रॅक्टर वाहतुकीसह अन्य ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. ते बंद करण्यासाठी शिवसेनेने असे व्यवसाय करणाऱ्या कन्नडिगांना हटावो ही मोहीम हाती घेतली आहे. आजच्या आंदोलनात ट्रॅक्टरचालकांना इशारा दिला आहे. यापुढे ही मोहीम सुरूच ठेवणार आहे.-संजय पवार,शिवसेना जिल्हाप्रमुख
कर्नाटकच्या ट्रॅक्टरांची हवा सोडली
By admin | Updated: July 30, 2014 00:43 IST