कोल्हापूर : वर्चस्व वादातून कांदेकर विरुद्ध मोरस्कर गटात संघर्ष पेटला असून, या दोन्ही टोळींवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांनी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच्या दाखल गुन्ह्यांची माहिती प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आली असून, महापालिका निवडणुकीपूर्वी या दोन टोळ्यांना शहरातून हद्दपार करण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू आहेत. वर्चस्व वादातून कांदेकर गटाचे समर्थक किशोर भोसले (महाराज) यांचे घर पेटविल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी रणजित मोरस्करसह चौघांना अटक केली आहे. या दोन्ही टोळ्यांमध्ये रंकाळा टॉवरचा डॉन कोण यावरून वारंवार धुमश्चक्री उडत असते. या दोन्ही टोळ्या हद्दपार करण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांनी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे विधानसभा निवडणुकीनंतर प्रस्ताव पाठिवला आहे; परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यानंतर पुन्हा मोरस्कर गटाकडून कांदेकर गटाच्या भोसलेंचे घर पेटविण्याचा प्रयत्न झाल्याने लक्ष्मीपुरी पोलिसांनी या गुन्ह्यांची फाईल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. दोन्ही टोळ्यांना महापालिका निवडणुकीपूर्वी हद्दपार करावे, अशी विनंती पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कांदेकर-मोरस्कर टोळी हद्दपार करणार
By admin | Updated: December 2, 2014 00:18 IST