जयसिंगपूर : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी आरक्षित जागेसमोरील असणारे बस थांबा काढून दुसरीकडे स्थलांतरित करावे यासाठी जयसिंगपूर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना निवेदन देऊन एक महिना उलटला तरीही कोणतीही कार्यवाही झाली नाही. सर्व विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे शिवप्रेमींनी बसथांबा न काढता या बसथांब्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज बसथांबा असे नाव दिले.
शहरातील सांगली-कोल्हापूर महामार्गालगत असणाऱ्या जागेत अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्यासाठी जागा आरक्षित केली आहे. मात्र, तांत्रिक कारणास्तव या ठिकाणी अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आलेला नाही. दरम्यान, पुतळ्यासाठी आरक्षित असणाऱ्या जागेसमोर असणारा बसथांबा हटवावा, अशी मागणी शिवप्रेमींनी केली होती. मात्र, या मागणीकडेही संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शिवप्रेमींनी या बसथांब्यालाच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले.
यावेळी नगरसेवक बजरंग खामकर, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, सागर मादनाईक, अशोक पाटील, अक्षय पाटील, अभिजित भांदिगरे, स्वप्निल सावंत, शंकर नाळे उपस्थित होते.
फोटो – 23012021-जेएवाय-03, 04
फोटो ओळ – जयसिंगपूर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी आरक्षित असणाऱ्या जागेसमोरील बसथांब्यास शिवप्रेमींनी श्री छत्रपती शिवाजी महाराज असे नाव दिले.