निपाणी : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाची पाणीपातळी सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने वाढली आहे. बुधवारी ३४ फुटांवर असलेली पाणीपातळी गुरुवारी ३६ फुटांवर गेली होती. तर त्यानंतर गुरुवारी दिवसभर व रात्रभर झालेल्या पावसाने जवाहरलाल तलावाची पाणीपातळी ४० फुटांवर गेली आहे. गुरुवारी दिवसभरात ४ फूट पाणी वाढल्याने निपाणीला दिलासा मिळाला आहे.
जवाहर तलाव हा निपाणीची जीवनवाहिनी आहे. गेल्या दोन वर्षांतून तलाव ओव्हरफ्लो होत असल्याने शहराला पाण्याची कमतरता भासली नाही. यावर्षी जूनमध्येच ४० फुटांवर पाणी गेल्याने तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत निपाणी येथील पीडब्लूडीच्या पर्जन्यमापकावर ३०.३ तर, कृषी विभागाच्या पर्जन्यमापकावर ३०. ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने उघडीप न दिल्याने वेदगंगा व दूधगंगा या दोन्ही नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत.