जयसिंगपूर : शहरातील प्रलंबित प्रश्नावरून सोमवारी पालिका सभेत चांगलीच खडाजंगी झाली. प्रभागातील विकासकामांची यादी देऊनही कामे होत नाहीत, असा आरोप यावेळी करण्यात आल्याने सभेतील विषय वाचनापूर्वीच झालेली ही खडाजंगी चर्चेची ठरली. दरम्यान, जयसिंगपूर शहर स्थापना शताब्दी महोत्सव साजरा करणे, आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील वाचनालय या नावाने इमारत बांधकाम अंदाजपत्रक यासह सभेपुढील १४ विषयांना मंजुरी देण्यात आली.येथील नगरपालिकेच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात सोमवारी विशेष सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर होते. सुरुवातीला पुरस्कार मिळाल्याबद्दल दत्त व शरद साखर कारखान्याचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर विषयपत्रिकेचे वाचन सुरू होण्यापूर्वीच नगरसेवक चंद्रकांत खामकर व नगरसेवक सुनील लक्ष्मण पाटील यांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्नांच्या यादीचे काय झाले, अशी विचारणा केली. गटारी होत नाहीत, एका-एका प्रभागात ५० लाखांची कामे होतात. मात्र, आपल्या प्रभागात कसलाच निधी खर्च होत नाही, असा आरोप करून खामकर म्हणाले, नळाला मोटारी लावण्यात येत असल्यामुळे झोपडपट्टी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे यावर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी केली. नगरसेवकांनी सुचविलेल्या कामाबाबत काय करणार, असा प्रश्न उपस्थित करून खरं सांगा खोटं बोलू नका असे म्हणत नगरसेवक शिवाजी कुंभार यांनी प्रशासनाच्या कामाबाबत खंत व्यक्त केला. नदीची पाणी पातळी खालावल्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाई जाणवणार आहे, यामुळे कमकुवत असलेले जॅकवेलचे काम होणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाने निश्चित धोरण ठरवावे, अशी मागणी नगरसेवक अस्लम फरास यांनी सभागृहात केली. नगरसेवकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्याधिकारी हेमंत निकम म्हणाले, स्वच्छतेअंतर्गत दोन कोटी ६८ लाखाचा निधी पालिकेकडे उपलब्ध झाला आहे. त्यातील ५९ लाख रुपये खर्च झाला असून त्यातील निधी नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांवर खर्च करण्याबाबत विचार करण्यात येईल. शिवाय जॅकवेलच्या नूतनीकरणाबाबत आराखडा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.जयसिंगपूर शहर स्थापना शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या वर्षामध्ये विविध कार्यक्रम राबविण्यासाठी यावेळी समिती निवडण्यात आली. नगरपालिकेमार्फत आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील वाचनालय या नावाने अद्यावत सार्वजनिक वाचनालय इमारत बांधकामाच्या अंदाज पत्रकास मंजूरी, बौद्ध विहार जवळील जागेत बगीचा विकसित करण्यासाठी एक कोटी २३ लाख ५९ हजार रूपयाचा अंदाज पत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठविणे, राजेश टोपे जलतरण तलाव येथील जिमनॅशियम हॉलवरती दुसरा मजला बांधणे यासह सभेपुढील १४ विषयांना मंजूरी देण्यात आली. विषयपत्रिकेचे वाचन अनिल तराळ यांनी केले. सभेस नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. (प्रतिनिधी)जयसिंगपूर शहर स्थापना शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी समिती निवडण्यात आली. नगरपालिकेमार्फत सा. रे. पाटील वाचनालय या नावाने सार्वजनिक वाचनालय इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी, बौद्ध विहार जवळील जागेत बगीचा विकसित करण्यासाठी एक कोटी २३ लाख ५९ हजार रूपयाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठविणे, जिम्नॅशियम हॉलवरती दुसरा मजला बांधणे यासह १४ विषयांना मंजुरी देण्यात आली.
जयसिंगपूर पालिका सभेत खडाजंगी
By admin | Updated: January 12, 2016 00:32 IST