लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चांगली नोकरी, वर्षाला लाखोंचे पॅकेज, मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत वास्तव्य, जवळ आई-वडील नाहीत, आधुनिक जीवनशैली आणि सुटसुटीत-मौजमजेत आयुष्य जगण्याकडे कल... यामुळे उपवर मुलींकडून आयटी क्षेत्रातील मुलांच्या स्थळाला अधिक पसंती दिली जात आहे. काही वर्षांपूर्वी डॉक्टर, इंजिनिअर झालेल्या मुलांचे स्थळ मिळाले, म्हणजे वधुपालक भरून पावले, अशी मानसिकता होती. आता ती जागा आयटीने घेतली आहे. या स्पर्धेत आजही ‘शेतकरी मुलगा नको गं बाई’, ही मानसिकता मात्र कायम आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण अधिक, वर्षाला लाखोंचे पॅकेज, स्वातंत्र्याच्या संकल्पना, यामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तुलनेत मुलांमध्ये हे प्रमाण कमी आहे. पूर्वी डॉक्टर आणि इंजिनिअर झालेल्या मुलांना प्रचंड मागणी होती. आता मात्र गल्लोगल्ली बीएएमएस, बीएचएमएस झालेले डॉक्टर आहेत. इंजिनिअरिंगची झालेली पीछेहाट आणि नोकऱ्यांपेक्षा शिकलेल्या मुलांची संख्या जास्त झाल्याने या क्षेत्रातील मुलांनाही आता फारसे विचारात घेतले जात नाही.
तुलनेने गेल्या चार-पाच वर्षात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राने मोठी भरारी मारली आहे. माणसाचे जगणेच व्यापून टाकलेल्या या क्षेत्रात सध्या मुलं-मुली मोठ्या संख्येने करिअर करत असून, मुलींंना या क्षेत्रातला मुलगा नवरा म्हणून हवा असतो. वधू-वर सूचक केंद्रांकडे सध्या अशाच स्थळांना मागणी आहे.
---
आयटीचेच स्थळ का?
- शिकतानाच नोकरीची संधी
- वर्षाला लाखोंचे पॅकेज
- मुंबई-पुण्यात नोकरी
- आई-वडील जवळ नसतात.
- बंधमुक्त जगण्याचा आनंद
- परदेशात जाण्याची संधी
---
सर्वसामान्य कुटुंबांची फरफट
मुलींच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे लग्नच जुळत नाही. त्यात मुलगा दहावी-बारावी झाला असेल, ग्रामीण भागात राहणारा आणि शेतकरी असेल, तर मग प्रश्नच संपला. वयाची चाळिशी आल्यानंतरही वधू मिळत नाही.
--
कोल्हापुरात कुंडली बघून लग्न करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. घरदार, नोकरी, पगार, कुटुंबांची संस्कृती, चांगली माणसं... सगळं जुळून आलेलं असतं. पण कुंडली जुळत नाही म्हणून अनेक लग्नं जुळता जुळता राहिली आहेत. सध्याच्या जगात मुला-मुलींचे विचार, रक्तगट आणि आरोग्य चाचणी या गोष्टींचा विचार करून लग्नं ठरवली पाहिजेत.
- वसंतराव मुळीक
(अखिल भारतीय मराठा महासंघ. वधू-वर सूचक केंद्र)
---
मुली शिक्षण-नोकरीमुळे लग्नाआधीच घराबाहेर स्वतंत्र राहायला शिकतात. असंच आयुष्य लग्नानंतरही असावं, अशी त्यांची इच्छा असते. शिवाय अवास्तव अपेक्षा, मुक्त जगण्याच्या वेगळ्या संकल्पना असतात. त्यांना कुटुंब संस्कृतीचेही महत्त्व पटवून देण्याची गरज आहे.
- संयोगिता देसाई (संयोग वधू-वर सूचक केंद्र)
----
मुलींना सध्या वेलसेटल्ड मुलगा हवा असतो. पाचआकडी पगार, गाडी, घर-फ्लॅट, लाखोंचे पॅकेज या सगळ्या गोष्टी शिकून बाहेर पडले की लगेच मिळत नाहीत. त्यासाठी काही वर्षे जावी लागतात.
- शशिकांत खराडे (वर पालक)
---
आपली मुलगी लाडात वाढलेली असते. तिने सासरी सुखाने नांदावे, अशीच पालकांची इच्छा असते. याचा अर्थ तडजोडीची तयारी नाही असं नसतं. पण किती प्रमाणात आणि कोणकोणत्या बाबतीत तडजोड करायची, हे महत्त्वाचे आहे. पत्रिका बघण्यामुळे चांगली स्थळं नाकारली जातात.
- स्नेहल जाधव (वधू पालक)
---