जयसिंगपूर : तमदलगे-अंकली चौपदरीकरण रस्त्याप्रश्नी ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही ठेकेदार, अधिकारी यांच्याकडून दखल घेतली जात नव्हती. मात्र, ग्रामस्थांच्या आवाजाला ‘लोकमत’ने पाठबळ दिल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घेतल्याने प्रश्नाचा गुंता सुटण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडल्यामुळे ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. दरम्यान, संबंधित शेतकरी व ग्रामस्थांना त्यांची नुकसानभरपाई मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाक्यापर्यंतच्या चौपदरीकरण रस्त्यात जाणारी घरे, शाळा, शेतजमिनी याबाबत गेल्या तीन वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. ३१ मे पर्यंत रस्ता पूर्ण करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर येथील शेतकरी व ग्रामस्थांचा प्रश्न ‘जैसे थै’च आहे. तमदलगेमधील ३५ घरे या रस्त्यात जाणार असली तरी संबंधित ग्रामस्थांनी पर्यायी जागा द्या, अशी मागणी केली आहे. निमशिरगावच्या शाळेचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. आदी प्रमुख समस्यांमुळे येत्या ३१ मे पर्यंत रस्ता पूर्णत्वाचा प्रश्न ठेकेदार कंपनीला अडचणीचाच ठरणार आहे. (प्रतिनिधी)भरपाई मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे निमशिरगाव येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर २१ लाखांचा बोजा चढविण्यात आला होता. तो कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर बोजा कमी करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. काम हे न्यायीक पद्धतीनेच झाले पाहिजे. हुकूमशाही पद्धतीने होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. ठेकेदार कंपनीकडून संबंधितांना मोबदला मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्चितच पाठपुरावा करेल. - राजू शेट्टी, खासदारतमदलगे, जैनापूर व निमशिरगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे. जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर कदापी खपवून घेणार नाही. प्रसंगी मुख्यमंत्र्यांना भेटून तमदलगे येथील ग्रामस्थांना पर्यायी जागा देण्याबाबत प्रयत्न राहील.- उल्हास पाटील, आमदार‘लोकमत’च्या पाठपुराव्याचे कौतुकतमदलगे-अंकली बायपास रस्त्याप्रश्नी शेतकरी, ग्रामस्थ यांच्या प्रश्नाविषयी गेले दोन दिवस वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी पाठपुरावा सुरू केला आहे. यामुळे अधिकारी कामाला लागले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याचे तमदलगे, जैनापूर व निमशिरगाव ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
भरपाई मिळेपर्यंत गप्प बसणार नाही
By admin | Updated: April 22, 2015 00:32 IST