कोल्हापूर: मेघोली (ता. भूदरगड) येथील लघू प्रकल्प फुटीला पाटबंधारे विभागाचा गलथानपणाचा कारणीभूत असून अपयश झाकण्यासाठी क्वार्टझाईट खडकाचा व अतिरिक्त पावसाचा मुद्दा अधिकाऱ्यांकडून पुढे रेटला जात आहे. दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जनता दलचे शिवाजीराव परुळेकर यांनी केली आहे.
तलाव फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील, शिवाजीराव परुळेकर, वसंतराव पाटील, मधुकर पाटील यांनी केली. हा तलाव फुटण्यामागे क्वार्टझाईट खडक कारणीभूत असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे, हा प्रकल्प बांधताना तज्ज्ञांच्या लक्षात ही बाब आली नव्हती का, २१ वर्षे गळतीबाबत तक्रारी करूनही विभागाने का दुर्लक्ष केले, पंचायत समितीच्या मासिक सभेत पाच वेळा ठराव करूनदेखील उपाययोजना का केल्या नाहीत, असे प्रश्न परुळेकर यांनी उपस्थित केले आहेत.
पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. यात तलाव फुटीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, पीक कर्ज माफ करून दोन वर्षात याच परिसरात नवीन प्रकल्प उभा करावा. प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत एकरी एक लाखाचे सानुग्रह अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवावा, असाही पर्याय सुचवला आहे. शेत जमिनीची बांधबंदिस्ती व ड्रोनद्वारे जमिनीच्या हद्दी सरकारनेच निश्चित करुन द्याव्यात. वाहून गेलेले मोटर पंप, दुचाकी, शेती औजारे यांचीही नुकसानभरपाई द्यावी. पुरातून वाहून जाणाऱ्या वाचवणाऱ्या पाच तरुणांना शौर्य पदकाने सन्मानित करावे, अशा मागण्या केल्या आहेत.