कोल्हापूर : शहरातील अपूर्ण कामांबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, आयआरबी व महापालिका यांच्यातील नियोजित बैठक आज, मंगळवारी रद्द झाली. महामंडळ व आयआरबीच्या प्रतिनिधींनी आंदोलकांच्या धास्तीने बैठकीला येण्याचे टाळले. दरम्यान, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी प्रकल्पातील त्रुटींच्या मुद्द्यांच्या आधारे महामंडळाला पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील काही रस्ते अपूर्ण आहेत. रस्त्यांवरील विजेचे दिवे, युटिलिटी शिफ्टिंग, रस्त्यांशेजारील चॅनेल्स, आदी अनेक अपूर्ण कामे ‘आयआरबी’ने करणे गरजेचे आहे. आयआरबी ही कामे करण्यास कोल्हापुरात सुरक्षित वातावरण नाही, असे सांगून चालढकल करत आहे. प्रकल्पातील अपूर्ण कामे कधी होणार याबाबत चर्चा करण्यासाठी महामंडळासह आयआरबीच्या प्रतिनिधींशी आज बैठकीचे नियोजन केले होते. आढावा बैठक पुणे किंवा मुंबईत घ्यावी, अशी मागणी आयआरबीने महामंडळाकडे केली होती. मात्र, आंदोलकांच्या धास्तीमुळे महामंडळ व आयआरबीच्या प्रतिनिधींनी आजच्या बैठकीसाठी कोल्हापूरला येण्याचे टाळले. बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तिघांत होणारी ही चौथी आढावा बैठक रद्द झाल्याने आयुक्तांनी मनपा अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन महामंडळाला पत्रव्यवहार करण्याच्या सूचना केल्या. प्रकल्पाची देखरेख करण्याची जबाबदारी महामंडळाची असल्याने महामंडळाचे कार्यालय कोल्हापुरात पूर्ववत होणे गरजेचे आहे. प्रकल्पातील त्रुटी व अपूर्ण कामांवर लक्ष ठेवणे सोयीचे होईल. त्यासाठी कोल्हापुरात कार्यालय सुरू करण्याबाबत आयुक्तांना तातडीने शासनाला पत्र पाठविण्याच्या सूचना केल्याचे समजते. (प्रतिनिधी)महापालिकेने काढलेले मुद्दे वृक्षतोड व लागवड, पदपथ, पावसाळी पाणी नियोजन करा.मासिक कामांचा आढावा द्यावा.उर्वरित अपूर्ण कामांची यादी तयार करा.कराराप्रमाणे प्रत्येक चौकातील मनपाचे ५० मीटर रस्ते करा.रंकाळा व डी मार्ट येथील अपूर्ण रस्ता करा.वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजा.आवश्यक ठिकाणी दुभाजक व स्पीड ब्रेकर करा.क राराप्रमाणे प्रकल्पासाठी स्वतंत्र सल्लागार नेमा.महापालिकेचे महामंडळाने ४३० कोटी येणे द्यावे.टोलचा लेखा-जोखा द्या व संयुक्त खाते उघडा.रस्ते अंतर्गत लाईन टाकण्यासाठी धोरण ठरवा.नाक्यांवर इलेक्ट्रिक बोर्ड लावा.
आयआरबी, एमएसआरडीची पाठ
By admin | Updated: December 2, 2014 23:50 IST