महानगरपालिका घरफाळा विभागात गेल्या काही वर्षांपासून घोटाळे होत आहेत. घोटाळ्यातील चौदा प्रकरणांची चौकशी झाली. अजूनही काही प्रकरणांची चौकशी होत आहे. तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले यांनी केलेल्या काही घोटाळ्याची माहिती व पुरावे आपण प्रशासनास दिले आहेत. त्याअनुषंगाने चौकशी करणारे काही वरिष्ठ अधिकारी घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. परंतु, वरिष्ठांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे, असे शेटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
घरफाळा विभागातील विजय वणकुद्रे, प्रताप माने, धनंजय माने, नीलेश काळे हे कर्मचारी संजय भोसले यांच्या मर्जीतील आहेत. हे सर्व कर्मचारी संजय भोसले यांना वगळून अन्य कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होईल अशा पद्धतीने खोटी माहिती व नुकसानीचा तक्ता देत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशी खोटी व दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्यांचीही चौकशी करावी, तसेच त्यांच्याकडून दिली जाणारी माहिती तपासून पाहावी. शिवाय हे सर्व कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून घरफाळा विभागात कामाला आहेत. त्याच्या कारभाराचीही चौकशी केली जावी, अशी मागणी शेटे यांनी केली आहे.
संजय भोसले यांना नोटीस-
संजय भोसले यांनी घरफाळ्याची नवीन बिले जनरेट होणाऱ्या दिनांकापासून ९० दिवसांपर्यंत दंडाची आकारणी होणार नाही अशा पद्धतीने संगणक प्रणालीत दुरुस्ती करण्यास सिस्टीम मॅनेजरना पत्राने कळविले होते. परंतु, असे पत्र देण्यापूर्वी वरिष्ठांची मंजुरी घेतली होती का अगर कसे अशी विचारणा सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी भोसले यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी भोसले यांना नोटीस दिली असून, सात दिवसांत खुलासा देण्यास बजावले आहे.