कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीच्या मुलाखतीची प्रक्रिया उद्या, गुरुवारी आणि शुक्रवारी (दि. ५) होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात सकाळी दहा वाजल्यापासून मुलाखती होतील. पात्र ठरलेल्या १५ उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहण्याची पत्रे पोहोचली आहेत. यात शिवाजी विद्यापीठातील तीन प्राध्यापकांचा समावेश आहे.गेल्या दोन महिन्यांपासून कुलगुरू निवडीच्या प्रक्रिया सुरू आहेत. त्यात देशभरातून शंभराहून अधिक जणांनी अर्ज दाखल केले आहेत. एप्रिल आणि मेमध्ये अर्जांच्या छाननीची प्रक्रिया दोन टप्प्यांत झाली. मुलाखतीची प्रक्रियादेखील याच पद्धतीने होणार आहे. मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यासाठी त्रिसदस्यीय समितीने १५ उमेदवारांची निवड केली आहे. यात शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. एम. बी. देशमुख, हिंदी विभागाचे माजी प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण आणि जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. एस. पी. गोविंदवार, औरंगाबादमधील देवानंद शिंदे, सोलापूरचे डॉ. एल. पी. देशमुख, पुणे विद्यापीठाचे बी.सी.यू.डी. संचालक व्ही. बी. गायकवाड, भूगर्भशास्त्र विभागातील प्रा. नितीन करमळकर, दिलीप हुके, आदींचा समावेश आहे. यातील डॉ. देशमुख हे यापूर्वी अमरावती, नागपूर विद्यापीठांच्या कुलगुरुपदाच्या प्रक्रियेत अंतिम मुलाखतीपर्यंत पोहोचले होते. डॉ. चव्हाण आणि डॉ. गोविंदवार यांनी पहिल्यांदाच कुलगुरुपदासाठी अर्ज केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या १५ उमेदवारांना ई-मेल तसेच पत्राद्वारे मुलाखतीची वेळ आणि दिवस कळविण्यात आला आहे. दरम्यान, मुलाखतीसाठी निवड झालेल्या डॉ. देशमुख व गोविंदवार यांनी ई-मेल, पत्र आले असल्याचे सांगितले. डॉ. चव्हाण यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)नवीन कुलगुरू १५ जूनपूर्वी रुजू होणारमुलाखतीची प्रक्रिया त्रिसदस्यीय समिती पूर्ण करणार आहे. समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन असून उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे व विद्यापीठ प्रतिनिधी रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके सदस्य आहेत. मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यातून अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अंतिम मुलाखतीची प्रक्रिया शनिवारी (दि. ६) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविद्यालये १५ जूनपासून सुरू होणार आहेत. यापूर्वी विद्यापीठाला नवे कुलगुरू देण्याच्या दृष्टीने समितीची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे सोमवार (दि. ८) पूर्वी मुलाखतीची प्रक्रिया समिती पूर्ण करणार आहे.
कुलगुरुपदासाठी उद्यापासून मुलाखती
By admin | Updated: June 3, 2015 01:00 IST