कोल्हापूर : एकाच तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना किंवा त्यांच्या थेट संपर्कात आलेल्यांना नेण्यासाठी वाहनांचीच सोय होत नसल्याने, तालुका पातळीवर अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि ग्रामसेवक हवालदिल बनले आहेत. शासनाकडून यासाठी निधी नाही आणि गावातील कोणीही वाहने देण्यास तयार नाही, दुसरीकडे जिल्हा पातळीवर इतरांचे त्याचदिवशी स्वॅब घेण्याच्या सूचना, अशा दुहेरी कात्रीत हे अधिकारी अडकले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एप्रिल महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत निघाले आहेत. गेल्या काही दिवसात सातशेपासून ते बाराशेपर्यंत नवे रुग्ण नोंदविण्यात येत आहेत. मृतांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. हातकणंगले, करवीर, आजरा, शिरोळ तालुक्यात तर ही संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळेच आता वाहतुकीच्या समस्येला या अधिकाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
उदाहरणच द्यायचे झाल्यास, ३० एप्रिलला आजरा तालुक्यात ११७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या सर्वांना कोरोना उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली. जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिका, ‘१०८’ रुग्णवाहिका, तालुक्यातील काही ट्रस्ट, आजरा नगरपंचायतीची रुग्णवाहिका यातून हे रुग्ण आणण्यात आले. अशीच् अवस्था प्रत्येक तालुक्यात आहे. दर दिवशी प्रत्येक तालुक्याची रुग्णसंख्या वेगवेगळी असल्यामुळे त्यानुसार या सर्वांना उपचार केंद्रापर्यंत आणण्यासाठी या अधिकाऱ्यांना तसेच ग्रामसेवकांना जोडण्या घालाव्या लागत आहेत.
एकदा का या पाॅझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी दाखल केले की, या सर्वांना त्यांच्या जवळच्या संपर्कात असलेल्यांना त्याच दिवशी स्वॅबसाठी नेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. परंतु त्यांना गावातून स्वॅब देण्यासाठी न्यायचे कशातून, याबाबत मात्र स्पष्ट सूचना नाहीत. यासाठी लागणाऱ्या वाहनाचा खर्च कशातून करायचा, असा प्रश्न या अधिकाऱ्यांसमोर आहे. अनेक तालुक्यांतील जवळच्या संपर्कातील व्यक्तींचे याच कारणासाठी अजूनही स्वॅब दिले गेलेले नाहीत. अनेक ठिकाणी स्वॅब घेण्याची सुविधा तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्यासाठी ४० ते ५० किलोमीटरवर मोटारसायकलने जावा, म्हणून सांगण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे. जर त्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली नाही, तर यातील काहीजण स्वॅब देण्यासाठी जाण्यास टाळाटाळही करत आहेत. काही ठिकाणी जुन्या रुग्णवाहिका आहेत, मात्र तेथे चालक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
चौकट
गावातील वाहनही मिळताना अडचणी
पॉझिटिव्ह रुग्ण किंवा संंपर्कातील ग्रामस्थांना स्वॅबसाठी नेताना गावातील वाहन मागितल्यानंतर, तेही अनेक ठिकाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पैसे देताे, असे सांगूनही अनेकजण तयार होत नाहीत. या वाहनांचे सॅनिटायझेशन, चालकाला पीपीई कीट कोण देणार, असेही प्रश्न आहेत.
चौकट
हा आहे पर्याय...
जिल्ह्यात अनेक शासकीय आणि निमशासकीय विभागांची वाहने चालकांसह वापरात आहेत. मात्र कोरोनामुळे अनेक विभागांच्या कामकाजावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ज्या विभागांकडील अशी वाहने उपलब्ध होऊ शकतात, ती वाहने चालकासह प्रत्येक तालुक्याला उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ज्या पध्दतीने निवडणूक काळात वाहनांचे नियोजन केले जाते, तसे नियोजन आवश्यक आहे.