राजाराम लोंढे-- कोल्हापूर--स्थानिकपासून केंद्रातील नेत्यांच्या नावाने सुरू केलेल्या विविध सहकारी संस्थाच गायब असल्याची धक्कादायक माहिती सहकार विभागाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. अशा शंभरहून अधिक दूध व पशु संस्थांना कुलपे लागली आहेत. ‘विना सहकार नही उद्धार’ या वाक्याप्रमाणे ग्रामीण भागातील सामान्य माणसाची पत सहकारामुळेच निर्माण झाली. शेतकरी, कामगारांसह सर्वच घटकांच्या जीवनात सहकारामुळेच स्थैर्य निर्माण झाले, हे मान्यच करावे लागेल. सामान्य माणसाच्या जीवनात सहकार संस्थांना मंदिराचे, तर संस्थाचालक नेत्यांना देवाचे स्थान होते. त्यामुळेच आपला ‘कुलस्वामी’, ‘ग्रामदैवत’ यांच्या नावांबरोबर स्थानिक नेत्यांपासून राष्ट्रीय नेत्यांच्या नावाने संस्थांच्या स्थापना करण्यात आल्या. देव-देवतांसह नेत्यांना साक्षी ठेवून संस्थेचा कारभार पारदर्शक व सभासदाभिमुख व्हावा, हा त्यामागील उद्देश होता; पण अलीकडील पाच-दहा वर्षांत सहकारात स्वाहाकार आल्याने गोरगरिबांची ही मंदिरे उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. सहकारात खाबूगिरी वाढल्याने दरवर्षी शेकडो संस्था बंद पडत आहेत. यामुळे सहकार विभागाने सहकारात स्वच्छता मोहीम हाती घेऊन कागदावरील संस्थांचा शोध घेतला. गेले चार महिने कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थांचे सर्वेक्षण झाले. यामध्ये हजारो संस्था बंद आढळल्याच; शिवाय त्यापेक्षाही अधिक संस्थांचा ठावठिकाणाच सापडत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी प्रमुख नेत्यांच्या नावाने असलेल्या संस्थाच गावातून गायब झालेल्या दिसतात. दूध व शेळी-मेंढी पालनच्या एक हजार संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया दुग्ध विभागाने सुरू केली आहे. यामध्ये शंभरहून अधिक संस्था या नेत्यांच्या नावाने आहेत. जिल्हा बॅँक, दूध संघ, तालुका संघाच्या राजकारणासाठी नेत्यांच्या नावाने काढलेल्या संस्था सहकार विभागाच्या स्वच्छता मोहिमेत सापडल्या आहेत. तांब्याला डेअरी...हुंबऱ्याला पुढारी!गाव दोन गल्ल्यांचे आणि दहा दूध संस्था, अशी परिस्थिती अनेक गावांत आहे. ‘तांब्याभर दुधाला डेअरी आणि हुंबऱ्याला पुढारी’ अशी परिस्थिती करवीर, पन्हाळा, कागल, भुदरगड तालुक्यांत दिसते. केवळ ठरावासाठी काढलेल्या संस्था अस्तित्वात नसल्याची माहिती पुढे आली आहे.
केवळ नावासाठीच संस्था
By admin | Updated: November 30, 2015 01:06 IST