कोल्हापूर : दैनंदिन कामकाजातील कृतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६५ विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये संशोधनवृत्ती जागविण्याचा उपक्रम गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात राबविण्यात आला. डिपार्टमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (डीएसटी) इन्स्पायर इंटर्नशीप कॅम्पअंतर्गत संबंधित विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातील प्राथमिक धडे गिरविले.केंद्र सरकारच्या डीएसटी इन्स्पायर इंटर्नशीप कॅम्पच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये संशोधनवृत्ती रुजविण्याचा, त्यांना संशोधनक्षेत्राची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातंर्गत यावर्षी ‘इन्स्पायर कॅम्प’ हा गोखले महाविद्यालयात घेण्यात आला. त्यासाठी दहावीमध्ये ९३ टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या जिल्ह्यातील १६५ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड केली. त्यांना मार्गदर्शन, अभ्यासदौरा, चर्चासत्रे, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संशोधन क्षेत्राची ओळख प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात आली. या पाचदिवसीय कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातील प्राथमिकतेचे धडे गिरविले. या मार्गदर्शनावर आधारित त्यांची ३५ गुणांची बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप असलेली परीक्षा घेण्यात आली. पाथर्डी (औरंगाबाद) येथील राजर्षी शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य पी. टी. सावंत आणि इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्सचे (पुणे) प्रा. चंद्रशील भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, शुक्रवारी कॅम्पचा समारोप झाला. दरम्यान, कॅम्पमध्ये डॉ. अशोककुमार शर्मा, व्ही. एच. रायबागकर, व्ही. ए. बापट, ए. एन. बसुगडे, यु. व्ही. देसाई, एस. पी. कामत, डी. बी. जाधव, एस. आर. यादव, आदींनी मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ तयार व्हावे, असा या कॅम्पचा उद्देश आहे. महाविद्यालयातील कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला. करिअरसाठी संशोधन क्षेत्राचा नवा पर्याय विद्यार्थ्यांसमोर मांडला आहे.- डॉ. मंजिरी देसाई-मोरे (प्रशासनाधिकारी, गोखले महाविद्यालय)
‘इन्स्पायर’मध्ये विद्यार्थ्यांनी जागविली संशोधन वृत्ती
By admin | Updated: December 15, 2014 00:12 IST