लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील शाहू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, सॅक, बूट, आदी साहित्य वाटपातील अनियमितता, कोरोना संसर्गाच्या काळातील दंडात्मक कारवाईमधील भ्रष्टाचार व शहीद भगतसिंग उद्यानातील मनोरंजनासाठी बसवलेली बुलेट टॉय ट्रेनचा मुद्दा विरोधी सदस्यांनी चांगलाच उचलून धरला होता. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी तिन्ही विषयांसाठी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
नगरपालिकेच्या ३० जूनच्या सभेत शाहू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या बारा लाख ६० हजारांच्या गणवेश, बूट, सॅक, आदी शालेय साहित्यांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला होता. तसेच कोरोना महामारीच्या काळात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. मात्र, या कारवाईत पालिका कर्मचाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत असल्याचे यांनी पुराव्यानिशी सभागृहात सादर केले होते. तर शहिद भगतसिंग उद्यानात ‘बांधा-वापरा-हस्तांतर करा’, या तत्त्वानुसार मनोरंजनासाठी बुलेट टॉय ट्रेन बसवण्याचा विषय होता. या विषयावरही बावचकर यांनी आक्षेप घेत यापूर्वी उद्यानात बसवलेल्या ट्रेनचे नेमके काय झाले, असा सवाल करून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती पालिकेच्या आगामी सभेसमोर चौकशीचा अहवाल सादर करणार असल्याचे बावचकर यांनी सांगितले.