कोल्हापूर : राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे याआधीचे भाजप सरकार व आताच्या सरकारलाही सतत चुकीचे सल्ले देत आहेत. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. म्हणून त्यांच्या कामकाजाची चौकशी लावा, अशी आग्रही मागणी येथील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.
सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चा झाली.
यावेळी प्रा. जयंत पाटील म्हणाले, कुंभकोणी यांनी दिलेले सगळेच सल्ले चुकीचे आहेत. त्यामुळे महाधिवक्ता म्हणून ते अपयशीच ठरलेले आहेत. त्यांना पदावरून दूर करा.
ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, कुंभकोणी सगळ्यांनाच फसवत आहेत. कलम ११ वापरून मराठ्यांना कोर्टात टिकणारे आरक्षण द्या. आरक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक आरक्षणाला आयुष्य आहे. जे सुधारले आहेत त्यांना बाहेर काढा आणि जे मागास आहेत त्यांचा समावेश आरक्षणात करा, हीच आमची मागणी आहे.
यावेळी निवासराव साळोखे, बाबा पार्टे, सुजित चव्हाण, दिलीप देसाई, ऋतुराज माने, पिंटू राऊत, राजू लिंग्रस, महादेव पाटील, जयेश कदम, नीलेश लाड, अमर निंबाळकर, जयकुमार शिंदे, विजयसिंह पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
चौकट
खासदार संभाजीराजे यांचेच नेतृत्व
शिष्टमंडळातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व आम्ही काल मानत होतो, आज मानत आहोत आणि उद्याही मानू, अशा भावना व्यक्त केल्या. फक्त ते मांडत नसलेल्या मागण्या आम्ही मांडत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आधी आपण स्वतः चर्चा करून चर्चेसाठी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.