लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नदीवेस नाका मरगूबाई मंदिर परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा उपचारादरम्यान रविवारी (दि.४) रात्री मृत्यू झाला. धनंजय महादेव नायकवडे (वय २३, रा. घोरपडे नाट्यगृह पाठीमागे) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अफताब ऊर्फ मोसीन मोमीन, संकेत नाकार्डे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर आणखीन एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविले आहे. २८ मार्च २०२१ ला मध्यरात्री गावभागातील मरगूबाई मंदिर परिसरात धनंजय हा मित्र अजिंक्य जामदार व सौरभ ढोले यांच्यासोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी वरील तिघांनी धनंजयवर कोयत्याने हल्ला चढविला. त्यामध्ये त्याच्या डोक्यात व पोटावर वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. आता खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फोटो ओळी
०५०४२०२१-आयसीएच-०१ - धनंजय नायकवडे