आजरा :
राज्यातील ११ वी व १२ वीला शिकविणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विषयाच्या शिक्षकांना गेली २० वर्षे वेतन अनुदान व शिक्षक मान्यता मिळालेली नाही. राज्य शासनाने माहिती-तंत्रज्ञान विषय शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वर्षा निवासस्थानासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार राज्य आयटी विषय शिक्षक संघटनांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्री व शिक्षण संचालक यांना देण्यात आले आहे.
कोरोना महामारीचे आलेले संकट व वाढती महागाई आणि त्यात वेतन मिळत नसल्याने माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांची सध्या उपासमार सुरू आहे.
शासन अनुदानित तुकडीत सहा विषय शिक्षकांना वेतन अनुदान देते, पण त्यामध्ये माहिती -तंत्रज्ञान विषय असेल तर वेतन अनुदान देत नाही, ही शोकांतिका आहे.
गेली २० वर्षे वेतन अनुदान व शिक्षक मान्यता मिळावी, यासाठी माहिती-तंत्रज्ञान विषय शिक्षकांनी अनेक वेळा आंदोलने, चर्चा केली; मात्र अद्याप वेतन अनुदान व शिक्षक मान्यता मिळाली नाही. शिक्षण विभागातील अधिकारी वेतन अनुदान देणे योग्य वाटते, असा शेरा मागणी निवेदनावर लिहितात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
माहिती-तंत्रज्ञान विषय शिक्षकांना ऑनलाइन टिचींग, कलचाचणी प्रशिक्षण, संच मान्यता प्रशिक्षण, १० वी व १२ वी बोर्ड परीक्षा अर्ज दाखल करणे, महाविद्यालयातील ऑनलाइनची सर्व कामे करावी लागत आहेत. त्याचबरोबर अकरावी व बारावीसाठी दैनंदिन शिक्षणाचेही महत्त्वपूर्ण काम करावे लागत आहे.
विद्यार्थ्यांचाही माहिती-तंत्रज्ञान विषय शिकण्याकडे कल वाढला असताना २००१ पासून तुटपुंज्या मानधनावर हे शिक्षक काम करीत आहेत. शिक्षक मान्यतेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून टाळाटाळ होत आहे. माहिती-तंत्रज्ञान विषय शिक्षकांना शिक्षण विभागाने मान्यता दिली नाही; मात्र वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. या पाठीमागील गौडबंगाल काय आहे? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या शिक्षकांना वेतन अनुदान व शिक्षक मान्यता तातडीने द्यावी, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यातील माहिती-तंत्रज्ञान विषयाचे शिक्षक लाक्षणिक उपोषण करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.