इचलकरंजी : हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला व ताप याचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यांना आजार बरा होईपर्यंत घरी थांबविण्याचा, तसेच दोन्ही तालुक्यांतील सर्व डॉक्टरांनी ‘स्वाईन फ्लू’बाबत दक्षता बाळगण्याची सूचना द्यावी, असा निर्णय प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीत घेण्यात आला.शहराबरोबरच ग्रामीण परिसरातही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना व दक्षता म्हणून येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये दोन्ही तालुक्यांतील शासकीय व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे होत्या.बैठकीस शिरोळचे तहसीलदार सचिन गिरी, इचलकरंजीचे मुख्याधिकारी सुनील पवार, कुरुंदवाडचे मुख्याधिकारी अतुल पाटील, वडगावचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतगेकर, जयसिंगपूरचे मुख्याधिकारी हेमंत निकम, डॉ. सुनीलदत्त संगेवार, डॉ. जी. एस. वेताळ, डॉ. ए. बी. लाटवडेकर, डॉ. विवेकानंद पाटील, नायब तहसीलदार अनिल साळुंखे, विजय राजापुरे, आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये स्वाईन फ्लूने मृत झालेल्या प्रमिला पाटील, तसेच दोन्ही तालुक्यांतील रुग्णांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये इचलकरंजीत पाच रुग्ण, हुपरीमध्ये एक व कबनूर येथे एक असे रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात आले. खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित शासकीय अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना स्वाईन फ्लूविषयी दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे सांगण्यात आले.
‘स्वाईन फ्लू’विषयी दक्षतेच्या सूचना
By admin | Updated: February 26, 2015 00:10 IST