भुदरगड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढत चाललेली संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने तीनशेसाठ खाटांची व्यवस्था केली आहे. तर अतिरिक्त रुग्णांना कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
या तालुक्यात आज अखेर २२८५ लोकांना कोरोना झालेला आहे. त्यापैकी १ हजार ८७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ३४७ रुग्णांवर उपचार सुरू असून, ४०७ संस्था विलगिकरण करण्यात आले आहे.
२६२ रुग्ण कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. ६९ रुग्णांवर सीपीआर येथे उपचार केले आहेत. ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.
मौनी विद्यापीठाच्या ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये २०० खाटांचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये ५० बेड हे ऑक्सिजन बेड आहेत. याठिकाणी डॉ. मिलिंद कदम, डॉ. भगवान डवरी हे गेल्या वर्षीपासून रुग्णांवर उपचार करीत आहेत. नवजात बालकापासून नव्वद वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांना कोरोनामुक्त केले आहे. यामध्ये डॉ. कदम हे कोरोना बाधित होऊनदेखील त्यांनी रुग्णांची केलेली सुश्रुषा तालुक्यात लोकांची विश्वासाहर्ता वाढविणारी ठरली आहे.
बारदेस्कर संकुलात देवराज बारदेस्कर यांनी ५० खाटांचे कोविड सेंटर उभारले असून, त्यामध्ये २५ बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. आदमापूर येथील बाळू मामा देवस्थानच्यावतीने ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये १५ बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. याशिवाय खासगीमध्ये लक्ष्मी नारायण हॉस्पिटल, व्यंकटेश्वरा हॉस्पिटलमध्ये तीस तीस बेडची व्यवस्था असून, ऑक्सिजनयुक्त अनुक्रमे १७ आणि १० बेड उपलब्ध आहेत. मुदाळ तिट्टा येथे डॉ. मगदूम यांनी दहा खाटांची उपलब्धता करून ठेवली आहे.
तालुक्यात एकूण ११७ ऑक्सिजनयुक्त तर २५३ सर्वसाधारण बेड उपलब्ध करून दिले आहेत.
आज अखेर ४६५८१ लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून, ९६२१ लोकांनी दुसरा डोसदेखील घेतला आहे. यामध्ये ४५ वर्षे वयावरील आणि हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाइन वर्कर यांचा समावेश आहे.